महाराष्ट्र फुटबॉल संघात कोल्हापूरच्या 8 जणींची निवड
वर्ध्यात चाचणी : क्रीडा व युवक संचालनालयातर्फे आयोजन : जानेवारीत कोल्हापूरात होणार राष्ट्रीय शालेय 14 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धा
कोल्हापूर :
वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय शासकीय शालेय 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभागातून प्रतिनिधीत्व केलेल्या तीन शाळांमधील तब्बल 8 मुलींची महाराष्ट्र राज्य संघात निवड करण्यात आली आहे. सिद्धी हवालदार, आर्या कांबळे, माही वायफळकर, सिद्धी शेळके, गोलरक्षक श्रेष्टी माने, कुमकुम सुत्रधार, बसंतीपूजा व रीनादेवी अशी निवड झालेल्या मुलींची नावे आहेत. त्यांची महाराष्ट्र संघात निवड केल्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या संघ निवड समितीने अधिकृतपणे जाहीर केले आहे. जानेवारी 2025 ला कोल्हापूरमध्येच आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघात प्रतिनिधीत्व करणार आहे.
वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभागातून स्पर्धेत श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल, उषाराजे हायस्कूल व संजीवन विद्यानिकेतनने प्रतिनिधीत्व केले होते. या शाळांमधील वरील आठही मुलींनी स्पर्धेत उठावदार खेळ केला होता. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र संघ निवड चाचणीसाठी त्यांची निवड केली होती. वर्धा येथेच पुण्यातील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या महाराष्ट्र संघ निवड समितीच्या वतीने 18 जणींच्या महाराष्ट्र संघ निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खेळवलेल्या सामन्यात आठही जणींनी आपल्याकडील फुटबॉल स्कील दाखवले. त्यांनी दाखवलेल्या स्कीलची निवड समितीने दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र संघात स्थान दिले. तसेच सातवी खेळाडू निशितादेवी हिला स्टॅण्डबाय (राखीव खेळाडू) म्हणून निवडलेले आहे.