उत्तरकाशीत 8 दिवसात 8 भूकंप
वृत्तसंस्था/ उत्तरकाशी
उत्तराखंडच्या उत्तरकाशीत शुक्रवारी पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. शुक्रवारी सकाळी 9.28 वाजता भूकंपाचा धक्का जाणवला असून रिश्टर स्केलवर याची तीव्रता 2.7 इतकी होती. तर याचे केंद्र बाडाहाट रेंजच्या नाल्ड येथील जंगलांमध्ये होते. मागील 8 दिवसांमध्ये उत्तरकाशीत भूकंपाचे 8 धक्के जाणवले आहेत. 24 जानेवारीपासून उत्तरकाशीत कमी तीव्रतेचे भूकंप होत आहेत. सातत्याने होत असलेल्या भूकंपामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयासह आसपासच्या क्षेत्रात गुरुवारीही भूकंपाचा धक्का जाणवला होता. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 2.7 इतकी होती. तर या भूकंपाचे केंद्र यमुनाघाटीमध्ये सरुताल सरोवरानजीकच्या वनक्षेत्रात जमिनीत 5 किलोमीटर खोलवर होते. मागील 1 आठवड्यापासून उत्तरकाशीत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. 24 जानेवारी रोजी सकाळी भूकंपाचे तीन धक्के जाणवले होते. यातील दोन धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.5 आणि 3.5 इतकी होती. यातील एक धक्का अत्यंत कमी तीव्रतेचा असल्याने रिश्टर स्केलवर त्याची नोंद झाली नव्हती.
तर 25 जानेवारी रोजी दोन धक्के जाणवले, ज्यातीलपहिला 2.4 तीव्रतेचा होता. तर दुसरा धक्का रिश्टर स्केलवर नोंदविला जाऊ शकला नव्हता. बुधवारी पहाटे 3.28 वाजता 2.7 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. तर गुरुवारी संध्याकाळी 7.31 वाजता भूकंपाचा सातवा धक्का जाणवला होता. भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत असल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु अद्याप या धक्क्यांमुळे कुठल्याही प्रकारची आर्थिक किंवा जीवितहानी झालेली नाही.