Stones pelted at ED vehicles 'ईडी'च्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या त्या ८ जणांवर गुन्हा दाखल
बुधवारी केरळममध्ये एक नाट्यमय घटना घडली. या घटनेचे केंद्र होते माजी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांचे निवासस्थान. पिनराई विजय यांच्या चौकशीसाठी आलेल्या ईडीच्या पथकावर कार्यकर्त्यांकडून हल्ला झाला. ईडीच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) रावडा आझाद चंद्रशेखर यांनी बुधवारी दिली.
८ जणांवर गुन्हा दाखल
या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पत्रकारांशी बोलताना केरळमचे डीजीपी चंद्रशेखर म्हणाले, "बुधवारच्या घटनेनंतर आम्ही आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आम्ही यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींनाही ओळखले असून, त्यांच्यावरही योग्य कारवाई केली जाईल."
ईडीचे अधिकारी कसली चौकशी करत होते?
एका प्रकरणात ईडीने छापेमारी करायला सुरुवात केल्यानंतर ही घटना घडली. हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड (CMRL) मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने केलेल्या छाप्यांदरम्यान ही घटना घडली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पिनारयी विजयन यांच्या निवासस्थानासह राज्यभरातील १० ठिकाणी शोधमोहीम राबवली.
वाहनांवर दगडफेक
छापे संपत असतानाच आंदोलने सुरू झाली. कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या वाहनांना घेराव घातला आणि धावत्या वाहनांवर विटा फेकून त्यांचे नुकसान केले.
केरळचे गृहमंत्री रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले की, राज्य सरकारला किंवा गृह मंत्रालयाला ईडीच्या छाप्याची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. ते म्हणाले, "ईडीने केरळ सरकारकडून कोणतीही मदत मागितली नाही. या कारवाईची माहिती एजन्सीला पूर्णपणे दिली पाहिजे."