84 लाख मतदार मसुदा यादीतून वगळणार
राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती : एसआयआरची आतापर्यंत 76.99 टक्के प्रगती साध्य
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
राज्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेत तब्बल 84 लाख 31 हजार 612 मतदारांना पहिल्या मसुदा मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहेत. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अन्बुकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
बीएलओंनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन पडताळणी केली असून मृत व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रांसोबतच संबंधित व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे, या 84 लाखांहून अधिक लोकांचा पहिल्या मसुदा यादीत समावेश केला जाणार नाही, असे अन्बुकुमार यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाने पहिल्या मसुदा यादीतून वगळण्यासाठी एकूण 84,31,612 मतदारांची ओळख पटवली आहे, त्यापैकी 51,74,968 कायमस्वरुपी स्थलांतरित आहेत. 14,99,799 मृत मतदारांची ओळख पटवण्यात आली आहे, तर 11,61,231 लोक कोणताही मागमूस न लागलेला (अवैध) नाही. शिवाय, बोगस किंवा दुहेरी मतदार नोंदणी असलेले 5,62,572 लोक आणि स्वाक्षरी करण्यास नकार देणाऱ्या 33,042 जणांनाही मसुदा यादीतून वगळण्यासाठी सूचीबद्ध केले गेले आहे.
राज्यात आतापर्यंत वितरित केलेल्या एकूण 5,54,32,314 एसआयआर अर्जांपैकी 4,26,75,861 अर्ज परत स्वीकारून त्यांचे डिजिटलायझेशन झाले असून, यात 76.99 टक्के प्रगती झाली आहे. पडताळणीदरम्यान, राज्यभरात एकूण 84,31,612 अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, बोगस आणि इतर प्रवर्गातील (एएसडीडीओ) मतदार आढळून आले आहेत. 43,24,841 मतदारांची माहिती अद्याप प्राप्त व्हायची आहे आणि 8 ऑगस्टनंतर त्यांच्याबद्दलचे संपूर्ण स्पष्ट चित्र उपलब्ध होईल. तसेच, 3.22 लाख ऑनलाईन अर्ज, 2,283 फॉर्म-6ए आणि 7.73 लाख फॉर्म-7 प्राप्त झाले आहेत.
निवडणूक आयोगाकडून शेवटची संधी
ज्या मतदारांनी अद्याप आपली माहिती भरणा केलेले एसआयआर अर्ज परत केलेले नाहीत, त्यांनी 8 ऑगस्टपर्यंत बीएलओंच्या मदतीने अर्ज करावा. सुमारे 29 लाख मतदारांनी ‘2002 ची माहिती उपलब्ध नाही’ असे कारण देत आपले अर्ज परत केले आहेत. तथापि, माहिती उपलब्ध नसली तरी, त्यांना बीएलओंच्या मदतीने अर्ज करण्याची संधी आहे. कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले 51.74 लाख मतदार सध्या कर्नाटकातील कोणत्यातरी मतदारसंघात राहत आहेत आणि त्यांनी देशात इतरत्र कुठेही मतदानाचा हक्क नसेल तर, ते फॉर्म-6 द्वारे योग्य पत्त्याचा दस्तऐवज सादर करून अर्ज करू शकतात. जर त्यांनी कर्नाटकातील त्यांच्या वास्तव्याचा पुरावा देणारी योग्य कागदपत्रे सादर केली, तर त्यांच्या नावांचा विचार केला जाईल, अन्यथा त्यांना अंतिम यादीतून वगळले जाईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अन्बुकुमार यांनी स्पष्ट केले.
वगळलेले मतदार वर्गवारी...
51,74,968 स्थलांतरित
14,99,799 मृत मतदार
11,61,231 अवैध मतदार
5,62,572 बोगस/दुबार नोंदणी