For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिरेकोडीत जेवणातून 77 विद्यार्थ्यांना विषबाधा

12:14 PM Sep 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
हिरेकोडीत जेवणातून 77 विद्यार्थ्यांना विषबाधा
Advertisement

मोरारजी देसाई निवासी शाळेतील प्रकार : सरकारी दवाखान्यात उपचार सुरू : विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा

Advertisement

चिकोडी : जेवणातून विषबाधा झाल्याने 77 शालेय विद्यार्थी अस्वस्थ झाल्याची घटना हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेत शुक्रवार 12 रोजी सकाळी उघडकीस घडली. यानंतर प्रशासनाने धाव घेत मुलांना दोन सरकारी दवाखान्यात दाखल केले असून त्यापैकी 70 विद्यार्थी तालुका रुग्णालयात तर 6 विद्यार्थ्यांना माता शिशु रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका विद्यार्थ्याला अधिक चिकित्सेसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शाळेतील पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने व आहार पदार्थ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

चिकोडी तालुक्यात हिरेकोडी येथे मोरारजी निवासी शाळा आहे. येथे पहिली ते दहावीपर्यंतचे सुमारे 400 विद्यार्थी राहतात. नेहमीप्रमाणे सकाळी उठून शाळेला जाताना काहीजणांनी नाष्टा केला होता तर काहीजण नाष्टा करायचे होते. तोपर्यंत अनेकांना जुलाब व उलटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तेथील वॉर्डन व शिक्षकांनी खबरदारी म्हणून तत्काळ मुलांना रुग्णालयात हलविण्यासह वरिष्ठांना याची माहिती दिली. काही मुलांना त्रास होत असताना पाहून अनेक विद्यार्थी भयभीत झाले. यामध्ये सध्या पहिली ते दहावीपर्यंतची अर्धवार्षिक (एफए-2) परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षा देताना घाबरून गेले होते.

Advertisement

विद्यार्थ्यांना अन्नातून बाधा झाल्याची माहिती मिळताच आरोग्य खाते, शिक्षण खाते, महसूल खाते, पोलीस खात्याने दवाखाना व मोरारजी निवासी शाळेकडे धाव घेतली. तेथे परिस्थिती नियंत्रणात असल्याने दवाखान्यातील उपचाराची माहिती घेण्यासाठी सर्व अधिकारी आले. रुग्णालयात विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, चिकोडी शैक्षणिक जिह्याचे उपसंचालक आर. एस. सीतारामू, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. एस. गडेद, पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, तहसीलदार राजेश बुर्ली, मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुला यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

डीडीपीआय सीतारामु यांनी दवाखान्याला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी ते म्हणाले, रात्री जेवल्यानंतर, पाण्यामुळे की नाष्ट्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला याची माहिती घेण्यात येईल. काही विद्यार्थ्यांना नाष्ट्यापूर्वी तर काही विद्यार्थ्यांना नाष्ट्यानंतर त्रास झाला आहे. 400 विद्यार्थी असलेल्या निवासी शाळेतील 78  विद्यार्थ्यांना दवाखान्यात दाखल केले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठीक आहे. दहावी परीक्षा सुरू असल्या तरी या शाळेतील विद्यार्थ्यांना तब्येत बरी झाल्यावर परीक्षा देण्याची मुभा दिली जाणार आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली असून पुढील कार्यवाही करण्याबाबत जिह्यातील वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील.

आमदार हुक्केरींची भेट

घटनेची माहिती मिळताच वायव्य शिक्षक मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी तालुका सरकारी रुग्णालय व माता-शिशू रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्याची विचारणा करताना त्यांना धीर दिला. अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना दिली. आमदार हुक्केरी यांनी डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेऊन चिकोडी परिसरातील सरकारी डॉक्टरांना येथे पाचारण करण्यास सांगितले. याशिवाय खासगी रुग्णवाहिका आणि दवाखान्यालाही फोन करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपचारासाठी मदतीची सूचना दिली.

जुलाब व उलटीचा त्रास

जुलाब व उलटीचा अधिक त्रास असलेल्यांना रुग्णवाहिका व खासगी वाहनांतून चिकोडी येथील तालुका सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. यानंतर आणखी काही विद्यार्थ्यांना परीक्षा देताना त्यांनाही त्रास होत असल्याने तेही सरकारी दवाखान्यात दाखल केले आहेत. यापैकी 70 विद्यार्थी चिकोडी तालुका सरकारी रुग्णालयात, 6 विद्यार्थ्यांना माता-शिशू रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच एका विद्यार्थ्यावर बेळगाव जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.

Advertisement
Tags :

.