दहशतवादी घटनांमध्ये 77 टक्क्यांची घट
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली माहिती : जीवितहानीचे प्रमाण झाले कमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात दहशतवादी घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. 2023 पर्यंत मागील 5 वर्षांमध्ये दहशतवादी घटना आणि चकमकींचे प्रमाण 77 टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच दहशतवादी घटनांमधील सर्वसामान्य नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाणही 75 टक्क्यांनी घटल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने अंतर्गत सुरक्षा विषयक संसदीय स्थायी समितीला दिली आहे. या समितीचे प्रमुख भाजप खासदार राधामोहन दास अग्रवाल आहेत.
गृह मंत्रालयाने समितीला विविध क्षेत्रांमधील स्वत:च्या कामगिरीची माहिती दिली आहे. यात डावा उग्रवाद, काउंटर टेररिजम, अंतर्गत सुरक्षा, सायबर गुन्हे, सीमा व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन सामील आहे. गृह मंत्रालयानुसार 2023 मध्ये मोहिमेदरम्यान 30 जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. तर 2018 मध्ये हे प्रमाण 91 इतके राहिले होते. म्हणजेच जवान हुतात्मा होण्याचे प्रमाण 67 टक्क्यांनी कमी झाले आहे. 2018 मध्ये 417 दहशतवादी घटना घडल्या होत्या. 2023 मध्ये हा आकडा कमी होत 94 वर आला आहे. परंतु जम्मू-काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला सरकार स्थापन झाल्यापासून दहशतवादी घटना आणि चकमकींचे प्रमाण वाढले आहे.
दगडफेकीची एकही घटना नाही
2023 मध्ये दगडफेक आणि फुटिरवाद्यांकडून बंद पुकारण्याची एकही घटना जम्मू-काश्मीरमध्ये घडलेली नाही. 2018 च्या तुलनेत अशा घटनांमध्ये 100 टक्क्यांची घट झाली आहे. दहशतवादी घटनांमध्ये नागरिकांचा बळी जाण्याचे प्रमाण 2018 मध्ये 55 राहिले होते. 2023 साली हा आकडा कमी होत 14 वर आला आहे. कलम 370 हद्दपार झाल्यावर सर्व केंद्रीय कायदे केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरवरही लागू झाले आहेत.
मोठ्या संख्येने पर्यटक दाखल
गृह मंत्रालयानुसार 2023 मध्ये 2.11 कोटी पर्यटकांनी जम्मू-काश्मीरला भेट दिली आहे. लडाख आणि जम्मू-काश्मीर दोन्हींकरिता तयार करण्यात आलेल्या विकास योजनांची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे. यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक जिवंत ग्राम कार्यक्रम सामील आहे. उत्तर सीमा वगळता अन्य सीमावर्ती क्षेत्रांमध्येही जिवंत ग्राम योजना राबविण्याचा प्रस्ताव आहे.
57 जणांना दहशतवादी केले घोषित
युएपीएमध्ये दुरुस्ती केल्यापासून 57 व्यक्तींना दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. यात दाऊद इब्राहिम, मसूद अझर, हाफिज सईद, अर्शदीप सिंह, गोल्डी बरार, लखबीर सिंह, वधवा सिंह सामील आहेत. एकूण 22 संघटनांना अवैध घोषित करण्यात आले असून 45 संघटनांना ‘दहशतवादी संघटना’ ठरविण्यात आले आहे.
डाव्या उग्रवादात घट
2023 पर्यंत डाव्या उग्रवादाच्या घटनांमध्ये 73 टक्क्यांची घट झाली आहे. 2010 च्या तुलनेत 2023 मध्ये डाव्या उग्रवादाच्या कारवाया 86 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तर डाव्या उग्रवादाने प्रभावित जिल्ह्यांची संख्या 2014 मध्ये 126 इतकी होती. 2024 मध्ये हा आकडा 38 वर आला आहे. अशाचप्रकारे डाव्या उग्रवादाने सर्वाधिक प्रभावित जिल्ह्यांची संख्या 2014 मध्ये 35 होती. हे प्रमाण 2024 मध्ये कमी होत 12 वर पोहोचले आहे.