For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात 76.6 टक्के मतदान

11:57 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यात 76 6 टक्के मतदान
Advertisement

मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांची माहिती

Advertisement

पणजी : गोव्यात मतदान संपेपर्यंत अंदाजे 76.06 टक्के मतदान झाले असून, यापैकी दक्षिण गोव्यात 74.47 टक्के तर उत्तर गोव्यात 77.69 टक्के इतके मतदान झाले आहे. 11,79,344 मतदारांपैकी 8,96,958 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. आल्तिनो येथील कर भवनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्य निवडणूक अधिकारी वर्मा यांनी सांगितले की, राज्यात मतदान संपेपर्यंत  76.06 इतके मतदान झाले आहे. या माहितीमध्ये पोस्टल बॅलेट आणि होम व्होटिंगचा समावेश करण्यात आलेला नाही. त्याची मतमोजणी झाल्यानंतर ही टक्केवारी वाढू शकते, असेही ते म्हणाले.

एकूण 190 तक्रारी दाखल

Advertisement

मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाकडे 19 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या चौकशीसाठी आम्ही तथ्यात्मक अहवाल मागितला आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल. गोवा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे एकूण 190 सार्वजनिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. उल्लंघनाच्या 38 तक्रारींपैकी 36 निकाली काढण्यात आल्या आहेत. दोन तक्रारींवर प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी 7 मे रोजी राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातील सांगे मतदारसंघ, तर उत्तर गोव्यातील पर्ये मतदारसंघांत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. सांगे मतदारसंघात 82.20 तर पर्ये मतदारसंघात 88.62 टक्के मतदान झाले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गत 2019च्या तुलनेत मतांची टक्केवारी वाढलेली आहे. महिला मतदारांनीही उत्स्फूर्त प्रतिसादात मतदान केल्याने ही मतांची टक्केवारी वाढली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी वर्मा यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने गोव्यात मतदानाची टक्केवारी 80 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात निवडणूक अधिकारी कार्यालय किंचित कमी पडले. परंतु तरीही समाधानकारक मतदान झल्याचा आनंद आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले. दक्षिणेतील वास्को मतदारसंघात 68.42 टक्के इतके मतदान झाले. तर उत्तरेतील पणजी मतदारसंघात 68.26 टक्के मतदान झाले. ह्या दोन्ही मतदारसंघात झालेले मतदान हे सर्वाधिक कमी म्हणून नोंदवले गेले आहे.

निवडणूककाळात 17.82 कोटींची मालमत्ता जप्त

लोकसभा निवडणुकीची राज्यात 16 मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यापासून अंमलबजावणी संस्थांनी गोव्यात 17.82 कोटी ऊपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामध्ये रोकड, सोने, दारू, ड्रग्ज यांचा समावेश आहे. 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जप्तीची ही टक्केवारी 40 टक्के अधिक आहे. तर 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ती 55 टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी दिली.

Advertisement
Tags :

.