टायटनला 756 कोटी रुपयांचा निव्वळ नफा
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
टायटन कंपनीने जून 2023 अखेरच्या पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून 756 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला आहे, जो मागच्या वर्षी समान अवधीत 790 कोटी रुपये इतका होता. यंदाच्या नफ्यामध्ये साधारण चार टक्के इतकी कमतरता दिसून आली आहे. तिमाही आधारावर पाहता कंपनीला मागच्या तिमाहीमध्ये 736 कोटी रुपये नफा झाला होता. या तुलनेत पाहता या खेपेला दोन टक्के नफा वाढला आहे. कंपनीचा एकत्रित महसूल 11,897 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षामागे याच अवधीत 9443 कोटी रुपये कंपनीने महसूल प्राप्त केला होता. महसुलामध्ये जवळपास 25 टक्क्यांची चांगली वाढ दर्शवली गेली आहे. मार्च तिमाहीअखेर कंपनीने 10,360 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता.
काय म्हणाले एमडी
व्यवसायाच्या दृष्टीने पाहता दोन अंकी महसुलामध्ये वाढ होणे ही कंपनीसाठी चांगली बाब असल्याचे मत व्यवस्थापकीय संचालक सी के वेंकटरमण यांनी व्यक्त केले आहे. कंपनीचा दागिन्यांचा व्यवसाय बऱ्यापैकी राहिला असून जवळपास 19 टक्के हा व्यवसाय वाढीव राहिला आहे. आगामी काळातही अपेक्षा खूप असल्याचे ते म्हणाले.