शहरातील जलकुंभांचे काम 75 टक्के पूर्ण
24 तास पाणी योजनेसाठी 9 जलकुंभांची उभारणी
बेळगाव : शहरवासियांची तहान भागविण्यासाठी एल अॅण्ड टी कंपनीकडून शहरातील 9 ठिकाणी जलकुंभ उभारण्यात येत आहेत. मागील दोन वर्षांपासून हे काम हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र अद्यापही जलकुंभ तयार होण्यासाठी जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे. शहरात 24 तास पाणी योजनेसाठी जलकुंभ उभारण्यात येत आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणी समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. मात्र यंदा पावसाअभावी हिवाळ्यापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत 24 तास पाणी योजना सुरू झाली असती तर काहीशी पाण्याची समस्या मिटली असती. मात्र 24 तास पाणी योजनेसाठी उभारण्यात येत असलेल्या जलकुंभांचे काम अद्यापही 25 टक्के शिल्लक आहे. शहरातील वडगाव, मृत्युंजयनगर, उद्यमबाग, गणेशपूर येथे दोन, कलमेश्वरनगर, देवराज अर्स कॉलनी, कणबर्गी, कावेरीनगर आदी ठिकाणी हे जलकुंभ उभारले जात आहेत.
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयातील पाण्याचा साठा व्हावा, यासाठी हे जलकुंभ तयार केले जात आहेत. शहरात 24 तास पाणी योजना राबविण्यासाठी पाण्याची साठवणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे जलकुंभ उभारणीसाठी प्राधान्य देण्यात आले आहे. शहरात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी भूमीगत जलवाहिन्या घालण्याचे कामदेखील सुरू आहे. या जलकुंभांचा आराखडा 2020 मध्ये तयार करण्यात आला होता. त्यानंतर मार्चपासून या कामाला प्रारंभ झाला आहे. मात्र योजना पूर्ण होण्यासाठी 2025 उजाडणार आहे. लाखो लिटर पाणी क्षमतेचे 9 जलकुंभ उभारले जात आहेत. त्यामुळे शहरातील पाणी समस्या मिटणार आहे. शहराची लोकसंख्या 6 लाखांहून अधिक आहे. त्यामुळे पाण्याचा साठाही अधिक प्रमाणात लागत आहे. मात्र पाणी साठवून ठेवण्यासाठी योग्य पर्याय नसल्याने जलकुंभ उभारले जात आहेत. शहरातील 58 वॉर्डांमध्ये 24 तास पाण्यासाठी साठवणूक महत्त्वाची आहे. यासाठी एल अॅण्ड टी कंपनीकडून जलकुंभ निर्मिती होऊ लागली आहे.
2025 पासून 24 तास पाणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल
शहरात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी एल अॅण्ड टी कंपनीकडून जलकुंभ उभारले जात आहेत. येत्या जूनपर्यंत हे काम पूर्णत्वाकडे जाईल. यंदाच्या उन्हाळी हंगामात जलकुंभ तयार होणार नाहीत. 2025 पासून 24 तास पाणी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल.
-हार्दिक देसाई, व्यवस्थापकीय संचालक, एल अॅण्ड टी.