‘त्या’ दरोड्यात 75 लाखांची रोकड लंपास
सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्याची कारही लांबविली : संकेश्वरनजीक राष्ट्रीय महामार्गावर भीतीचे वातावरण
प्रतिनिधी/ संकेश्वर
गत दोन दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर अज्ञातांनी कारवर दरोडा टाकून कारसह रोकड लांबवल्याची घटना चांगलीच रंगली होती. सदर दरोड्यात कोल्हापूरहून केरळकडे जाणारी कार अडवून चालकांना पिस्तुलीचा धाक दाखवून रोकडसह कार लांबवली आहे. या घटनेत 75 लाखांची रोकड लांबविल्याची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे.
या घटनेसंदर्भात समजलेली माहिती अशी, सूरज संजय व्हनमानी रा. करगणी ता. आटपाडी, जि. सांगली हा आपल्या चालक अरीफ सोबत केरळहून कारमधून तयार सोन्याचे दागिने घेऊन कोल्हापुरातील सोन्याच्या व्यापाऱ्याला देऊन त्याच्याकडील 75 लाख रुपयांची रोकड घेऊन परत केरळकडे कारने जात होते. संकेश्वरनजीक हरगापूर गडाच्या पायथ्याशी राष्ट्रीय महामार्गावर अज्ञातांनी कार अडवून पिस्तुलीचा धाक दाखवून कारमधील सर्वांना खाली उतरवून 75 लाखांच्या रोख रकमेसह कार लांबवली. सुरुवातीला कारमध्ये 3 कोटी 10 लाख रुपयांची रोकड असल्याची चर्चा होती. पण पोलिसांनी चौकशी केल्यावर उपलब्ध कागदोपत्रानुसार 75 लाख रुपयांची रोकड असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी गोकाक विभागाचे डीएसपी डी. एच. मुल्ला व संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एम. आवजी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन फिर्यादी सूरज संजय व्हनमानी याच्याकडून माहिती घेतली. अज्ञातांचा शोध घेण्याची मोहीम पोलिसांनी उघडली आहे. काही पथके महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकात पाठवून देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.