2028 ऑलिम्पिकमध्ये 75 किलो वजनी गट रद्द : लव्हलिना अडचणीत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
टोकियोतील ऑलिंपिक पदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन 2028 च्या लॉस एंजेलिस गेम्समध्ये तिचा सध्याचा 75 किलो वजनी गट रद्द करण्यात आल्याने अडचणीत सापडली असून ती त्यामुळे 70 किलो वजनी गटात जाऊ शकते. या बदलामुळे तिच्यावर नवीन गट निवडण्याचा प्रसंग आला आहे. आयओसीने बुधवारी एलए गेम्ससाठी इव्हेंट प्रोग्राम आणि अॅथलीट कोटा जाहीर केला. या फेरबदलामुळे बोरगोहेनला एक तर 70 किलोपर्यंत वजन कमी करावे लागेल किंवा 80 किलोहून जास्त वजन वाढवावे लागेल. ‘ही माझ्यासाठी अगदी नवीन माहिती आहे आणि खूपच धक्कादायक आहे’, असे या घडामोडीमुळे गोंधळलेल्या बोरगोहेनने गुवाहाटी येथून सांगितले. मला वाटते की, मला 70 किलोपर्यंत वजन कमी करावे लागेल. कारण 80 किलोहून जास्त वजन वाढवणे माझ्यासाठी कठीण होईल, असे ती म्हणाली. तिच्या वैयक्तिक प्रशिक्षक प्रणमिका बोरा याही या घडामोडीमुळे तितक्याच आश्चर्यचकित झाल्या आहेत.