75 वर्षे जुन्या युद्धगुन्ह्यांसाठी कोरियन लोकांना भरपाई
दुसऱ्या महायुद्धात जपानकडून अत्याचार :
वृत्तसंस्था/ सोल
दुसऱ्या महायुद्धावेळी जपानच्या युद्धगुन्ह्यांसाठी दक्षिण कोरियाचे सरकार स्वत:च्या लोकांना भरपाई देणार आहे. दक्षिण कोरियाचे विदेशमंत्री पार्क जिन यांनी यासंबंधी सोमवारी घोषणा केली आहे. जपानने दुसऱ्या महायुद्धोळी दक्षिण कोरियातील अनेक लोकांना गुलाम केले होते. तसेच तेथील महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आले होते.
याप्रकरणावरून दक्षिण कोरियाचे लोक अनेक वर्षांपासून जपानकडून भरपाईची मागणी करत आहेत. जपानने स्वत:च्या युद्धगुन्ह्यांसंबंधी अधिकृतपणे माफी मागावी अशी दक्षिण कोरियाच्या लोकांची इच्छा आहे. दोन्ही देशांदरम्यान या मुद्द्यावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. यामुळे आशियात चीनविरोधी लढाईत एकत्र असूनही दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटूता होती.
जपानच दुसऱ्या महायुद्धादरम्यान करण्यात आलेल्या गुन्ह्यांसाठी भरपाई देणार असा कयास वर्तविला जात होता, परंतु दक्षिण कोरियाच्या विदेशमंत्र्यांनी सोमवारी केलेल्या घोषणेनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. वेगवेगळ्या कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याद्वारे देणगी प्राप्त करत ही भरपाई पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचे विदेशमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
दक्षिण कोरिया आणि जपानने स्वत:चे जुने मतभेद विसरून नवी सुऊवात करण्याची ही वेळ असल्याचे विदेशमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मित्सुबिशी समवेत जपानच्या अनेक कंपन्यांना भरपाईसाठी योगदान करण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेकडून योजनेचे कौतुक
आशियात चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी दक्षिण कोरिया आणि जपान एकत्र यावेत हे अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याकरता दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची गरज आहे. अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या भरपाईच्या योजनेचे कौतुक करत याला ऐतिहासिक ठरविले आहे. परंतु दक्षिण कोरियातील लोक भरपाई योजनेबद्दल संतुष्ट नाहीत. या योजनेद्वारे कोरियाच्या सरकारने जपानला विजय मिळवून दिला आहे. आम्ही आमच्या गुन्ह्यांसाठी एक पैसाही देणार नसल्याचे जपानचे म्हणणे आहे. जपान स्वत:ची भूमिका कायम राखण्यास यशस्वी ठरल्याचा दावा युद्धगुन्ह्यांमधील पीडितांचे वकील लिम जे संग यांनी केला आहे.