झोमॅटोच्या महसुलात 74 टक्के वाढ
नवी दिल्ली :
खाद्य पदार्थांच्या वितरण व्यवसायात असणाऱ्या झोमॅटो कंपनीने जून अखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून आपल्या महसुलामध्ये 74 टक्क्यांची दमदार वाढ नोंदविली आहे.
एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीने 4 हजार 206 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे. यासोबतच कंपनीने 253 कोटी रुपयांचा निव्वळ नफाही प्राप्त केला आहे. गुरूगांवमध्ये या कंपनीचे मुख्यालय असून ब्लिंकीट आणि हायपरप्युअर या कंपन्यांच्या माध्यमातून झोमॅटोने आपल्या फूड व्यवसायात लक्षणीय कामगिरी केली आहे. नफा आणि महसुल प्राप्त करण्याच्या कामगिरीमध्ये झोमॅटोने प्रगती साधली आहे.
क्वीक कॉमर्स क्षेत्रातील कंपनी ब्लिंकीट आणि व्यवसाय ते व्यवसाय असा किराणा मालाचा पुरवठा करणारी हायपरप्युअर यांचीही मदत खाद्य पदार्थांच्या वितरणात झोमॅटोला लाभली आहे. ब्लिंकीटचे झोमॅटोच्या व्यवसायामध्ये अधिक योगदान दिसून येते आहे. आगामी काळामध्ये म्हणजेच 2026 पर्यंत ब्लिंकीटला 2 हजार डार्क स्टोअर्स सुरू करायच्या आहेत.