शहरात 74 इमारती धोकादायक
कोल्हापूर / अवधुत शिंदे :
कोल्हापूर महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या तोंडावर अति धोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. शहरात एकूण 74 इमारती धोकादायक आहेत. यामध्ये 37 इमारती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत येतात. गेल्या काही वर्षापासून महापालिकेने धोकादायक इमारतीवर केलेल्या कारवाईमुळे धोकादायक इमारतीची संख्या कमी होऊ लागली आहे.
कोल्हापुरात धोकादायक इमारतींची संख्या जास्त होती. पावसाळ्यात धोकादायक इमारती पडून दुर्घटना घडल्या आहेत. काही वर्षापूर्वी महापालिकेने धोकादायक इमारती पाडून टाकण्यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती हाती घेतली होती. त्यानुसार केलेल्या कारवाईला यश येत असून शहरात सध्या केवळ 74 धोकादायक इमारती उरल्या आहेत, असा दावा महापालिका प्रशासन करत आहे. .
दरम्यान, शहरात 74 धोकादायक इमारतींपैकी 29 अति धोकादायक इमारती आहेत. यामध्ये शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत 21 धोकादायक इमारतीत अद्याप रहिवाशांचे वास्तव्य आहे. या इमारती रिकाम्या करुन पाडून टाकणे हे महापालिकेपुढचे मोठे आव्हान आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. तसेच तत्काळ पाडून टाकणे आवश्यक असलेल्या अतिधोकादायक इमारती सी वन श्रेणीत समाविष्ट करण्यात येतात. अशा इमारतींची यादी कोल्हापूर महापालिकेकडून जाहीर केली जाते.
ज्या इमारती रिकाम्या करणे आणि त्यांची दुरुस्ती करणे अशा इमारती सी 2 ए श्रेणीत समाविष्ट करण्यात येतात. इमारती रिकाम्या न करता त्यांची रचनात्मक दुरुस्ती करणे अशा इमारती सी 2 बी श्रेणीत समाविष्ट करण्यात येतात. इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे अशा इमारती सी 3 श्रेणीत समाविष्ट करण्यात येतात. त्यात धोकादायक आढळणाऱ्या इमारतींमधील घरे रिकामे करण्यासाठी संबंधितांना नोटीस बजावली जाते. इमारत धोकादायक ठरवण्याबाबत रहिवाशांचे काही आक्षेप असल्यास ते न्यायालयात किंवा त्यांना इमारत धोकादायक वाटत नसेल तर ते महापालिकेच्या तांत्रिक समितीकडे धाव घेतात. त्यामुळे त्या इमारती पाडता येत नाहीत. तसेच एखाद्या इमारतींबाबत न्यायालयाने स्थगिती आदेश दिला तरी ती इमारत पाडून टाकता येत नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.
. धोकादायक इमारती -74
. रिकाम्या केलेल्या इमारती - 13
. वास्तव्य असलेल्या धोकादायक इमारती - 29
. इमारती रिकाम्या न करता रचनात्मक दुरुस्ती - 20
. किरकोळ दुरुस्ती असलेल्या इमारती - 12
- विभागीय कार्यालयानुसार धोकादायक इमारती
गांधी मैदान परिसर - 5
शिवाजी मार्केट परिसर - 37
राजारामपुरी परिसर - 17
ताराराणी मार्केट परिसर - 15
शहरातील धोकादायक इमारती उतरुन घेण्यासाठी इमारत मालकांसोबत पत्रव्यवहार सुरु आहे. काही इमारतींबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. यातून मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरु आहे.
- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, कोल्हापूर महापालिका