For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर तालुक्यात 73.78 टक्के शांततेत मतदान

10:21 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्यात 73 78 टक्के शांततेत मतदान
Advertisement

सर्वच मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान : पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरा मतदान यंत्रे कुमठाकडे रवाना : दुपारच्या सत्रात संथगतीने मतदान

Advertisement

खानापूर : खानापूर शहरासह तालुक्मयातील 312 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान झाले होते. तालुक्यातील सहा जिल्हा पंचायत क्षेत्रातील मतदान केंद्रांवर अत्यंत चुरशीने मतदान करण्यात येत होते. काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत असल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मतदान करून घेण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येत होते. सायंकाळी मतदान संपण्याच्या वेळी तालुक्यात एकूण 73.78 टक्के मतदान झाले होते. सर्वच मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वच मतदान केंद्रांवर शांततेने मतदान पार पडले आहे. तालुक्यातील सर्व मतदान यंत्रे सिद्धिविनायक इंग्लिश शाळेमध्ये एकत्रिकरण करून रात्री उशिरा चोख पोलीस बंदोबस्तात कुमठा येथे रवाना करण्यात आली आहेत.

तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर सोमवारी सायंकाळीच मतदान यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. मंगळवारी सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात करण्यात आली. सर्व मतदान केंद्रांवर एजंटांसमक्ष मतदान यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यानंतर मतदानास सुरुवात करण्यात आली. मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मतदान यंत्रणा राबवण्यात आली. मतदान सुरळीत पार पडल्यानंतर मतदान यंत्रे सीलबंद करून रात्री उशिरा येथील सिद्धिविनायक शाळेत जमा करण्यात आली आहेत.  खानापूर शहरात सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हाचा तडाखा जास्त असल्याने सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर गर्दी दिसून येत होती. पक्षाचे कार्यकर्ते मतदान केंद्रावर मतदान करून घेण्यासाठी धडपडताना दिसून येत होते. शहरातील तरुण मतदारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग यावेळी दिसून येत होता. एकूणच तालुक्यात तरुण आणि नव मतदार सक्रिय झाल्याचे प्रत्येक मतदान केंद्रावर चित्र होते.

Advertisement

पूर्व भागात 70 टक्के मतदान

तालुक्यात पूर्व भागातील कक्केरी व पारिश्वाड जिल्हा पंचायत क्षेत्रातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. पारिश्वाड व कक्केरी जिल्हा पंचायत क्षेत्रात कन्नडबहुल असल्याने या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षासाठी चुरशीने मतदान करून घेत होते. या दोन्ही जिल्हा पंचायत क्षेत्रात 70 टक्के मतदान झालेले आहे. निट्टूर येथील मतदान केंद्रावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे टॉवेल आणि टोप्या परिधान करून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत होते. याचवेळी  काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर या तेथे पोहचल्या. त्यावेळी त्यांनी आक्षेप घेत टॉवेल आणि टोप्या काढून घेऊन अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवून असा प्रकार पुन्हा घडू नये, अशी मागणी केली. गेल्या तीस वर्षात खासदारांनी 1 रुपयाचाही विकास केला नाही. गेल्या वर्षभरात आमदारही तालुक्यात फिरकत नाहीत. आणि भाजपचा प्रचार कशासाठी करता, असा सवालही त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला. त्यावेळी कार्यकर्ते निरुत्तर होऊन तेथून काढता पाय घेतला. लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रातील मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले. या ठिकाणी भाजप, काँग्रेस कार्यकर्ते मतदान केंद्रावर मतदान करून घेण्यासाठी सक्रिय होते. सकाळी 7 पासून दुपारी 12 पर्यंत मतदानाचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. दुपारनंतर मतदान मंदावले होते. तर दुपारी 4 नंतर पुन्हा मतदारांचा ओघ वाढला. आणि सायंकाळी सहापर्यंत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात चुरशीने मतदान झाले आहे.

गर्लगुंजी क्षेत्रात 70 टक्के मतदान

गर्लगुंजी जिल्हा पंचायत क्षेत्रातील गावामध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. सकाळच्या सत्रातच मतदारांनी 40 टक्क्याच्या वर मतदानाचा हक्क बजावला. दुपारच्या उन्हामुळे मतदान काही प्रमाणात कमी झाले होते. दुपारी 3 नंतर पुन्हा मतदारांनी गर्दी केली होती. सायंकाळी 6 पर्यंत गर्लगुंजी जिल्हा पंचायत क्षेत्रात 70 टक्के मतदान झाले होते. जांबोटी जिल्हा पंचायत क्षेत्रातील मतदारसंघातील दुर्गम अशा चिगुळे, मान, सडा, व्हळंद, चिखले, पारवाड, आमगाव, आमटे, गोल्याळी, कालमणी, बैलूर, जांबोटी या परिसरातील गावातून सकाळी मतदानास सुरुवात झाली. त्यावेळी  संथगतीने मतदान सुरू होते. सकाळी 9 नंतर मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती. 9 ते 2 वाजेपर्यंत 45 टक्के मतदान झाले हेते. दुपारी 2 ते 4 या वेळेत मतदार पुन्हा संथगतीने सुरू होते. दुपारी 4 नंतर पुन्हा मतदानास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जांबोटी जिल्हा पंचायत क्षेत्रात 65 टक्के मतदान झाले आहे. तालुक्यात सरासरी 73.78 टक्के मतदान झाले आहे.

गुंजीत चुरशीने 78 टक्के मतदान

कोणत्याही पक्षाने म्हणावा तसा प्रचार केला नसला तरी गुंजीतील मतदारांनी स्वयंप्रेरणेतून आपला मतदानाचा हक्क बजावून शांततेत 78 टक्के मतदान केले. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली तेंव्हापासूनच येथील मतदारांनी मतदान करण्यास प्रारंभ केला होता. कोणतीही घाईगर्दी न करता दोन्ही मतदान केंद्रांवर शांततेने मतदान पार पडले. एकूण 1549 मतदारांपैकी 1218 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 785 पुरुषांपैकी 611 पुरुषांनी मतदान केले तर 764 महिलांपैकी 607 महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावून पुरुषांपेक्षा जास्त मतदानाची बाजी मारली. त्यामुळे या ठिकाणी 78.63 इतके मतदान झाले.

अपुऱ्या बससेवेमुळे बाहेरगावच्या मतदारांची गैरसोय

गुंजीमध्ये मतदार यादीत नाव असलेले अनेक रहिवाशी कामानिमित्त बाहेरगावी आहेत. त्यामुळे मंगळवारी विविध भागातून नागरिकांनी गुंजीत मतदानाला येण्यासाठी दूरवरून प्रवास केला. मात्र अपुऱ्या बससेवेमुळे अनेकांना बेळगावमध्ये येऊनही बराच मनस्ताप सोसावा लागला. तर काहीना वेळेत बस न मिळाल्याने आल्यामार्गे मतदान न करताच फिरावे लागल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. मतदानादिवशी जादा बससेवा पुरवण्याची गरज असताना बससेवेत कपात केल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

जांबोटी मतदान केंद्रात 71 टक्के, ओलमणीत 72 टक्के मतदान

कारवार लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीमध्ये जांबोटी येथील मतदान केंद्रावर 71 टक्के तसेच ओलमणी येथील मतदान केंद्रात 72 टक्के मतदानाची नोंद झाली असून, सदर मतदान शांततेत पार पडले. जांबोटी-रामापूर पेठ मतदान केंद्र क्रमांक 30 मध्ये 69 टक्के मतदान झाले असून, एकूण 1036 मतदारांपैकी 718 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. तसेच जांबोटी मतदान केंद्र क्रमांक 31 मध्ये 75 टक्के मतदान झाले आहे. एकूण 777 मतदारांपैकी 585 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे.

ओलमणीत 72 टक्के मतदान

ओलमणी मतदान केंद्र क्रमांक 38 मध्ये 72 टक्के मतदान झाले असून एकूण 708 मतदारांपैकी 509 मतदारांनी तसेच ओलमणी मतदान केंद्र क्रमांक 39 मध्ये 74 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली असून, एकूण 620 मतदारांपैकी 453 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच वडगाव-जांबोटी मतदान केंद्रात 73 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला असून एकूण 364 मतदारांपैकी 267 मतदारांनी मतदान केल्याची नोंद झाली आहे. जांबोटी व ओलमणी मतदान केंद्रामध्ये सकाळी 11 पर्यंत मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर मतदान धीम्या गतीने सुरू होते. यावेळी नवमतदारांमध्ये मतदानासाठी मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला.

नंदगडमध्ये चुरशीने 75 टक्के मतदान

लोकसभेच्या निवडणुकीसाठी नंदगडमध्ये चुरशीने मतदान झाले. गावातील आठ मतदान केंद्रांवर एकूण 75 टक्के मतदान झाले. नंदगड गावात एकूण 8 मतदान केंद्रे आहेत. त्यामध्ये एकूण 7263 मतदार आहेत. त्यापैकी 5413 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासूनच गर्दी होती. दुपारच्या वेळी गर्दी ओसरली. परंतु सायंकाळी पुन्हा मतदान करण्यासाठी घराघरातून मतदार मतदान केंद्रावर दाखल झाले. नंदगड गावात यावेळी शांततेत आणि सुव्यवस्थेत मतदान झाले.

Advertisement
Tags :

.