पूर्व लडाखमध्ये आता ‘72 डिव्हिजन’ तैनात
चिनी आव्हानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याची नवी तयारी : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविली
वृत्तसंस्था/लेह
भारतीय सैन्याने पूर्व लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात करण्यासाठी नवी डिव्हिजन निर्माण केली आहे. याचे नाव ‘72 डिव्हिजन’ असून ती प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्थायी स्वरुपात तैनात असणार आहे. सैन्याच्या वर्तमान 3 डिव्हिजनच्या अतिरिक्त या नव्या डिव्हिजनची स्थापना करण्यात आली आहे. या डिव्हिजनवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा क्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. सैन्याचा हा निर्णय ऑर्डर ऑफ बॅटलमध्ये मोठ्या बदलाचा हिस्सा असून यात वर्तमान सैनिकांना पुन्हा तैनात करणे देखील सामील आहे.
गस्तसंबंधी मागील वर्षी करार
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्तवरून भारत आणि चीनदरम्यान मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये महत्त्वाचा करार झाला होता. यानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जून 2020 च्या पूर्वी जशी स्थिती होती तसेच राहणार आहे. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान हिंसक झटापट झाल्यापासून तणावाचे वातावरण होते. तसेच अनेक ठिकाणी गस्त थांबली होती.
पूर्वीप्रमाणेच गस्त सुरू
भारत आणि चीनदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाच ठिकाणी देपसांग, डेमचोक, गलवान खोरे, पँगोंग त्सो आणि गोगरा हॉट स्प्रिंगमध्ये तणाव होता. 2020 नंतर अनेक फेऱ्यांमधील चर्चेनंतर गलवान खोरे, पँगोंग त्सो आणि गोगरा हॉट स्प्रिंगमधून दोन्ही देशांचे सैन्य मागे हटले होते. परंतु देपसांग आणि डेमचोकमध्ये सैन्य तैनात राहिल्याने संघर्षाचा धेका कायम होता. परंतु आता करारानंतर पाच ठिकाणांहून भारत आणि चीनचे सैन्य हटले असून तेथे पूर्वीप्रमाणेच गस्त सुरू झाली आहे.
भारतासाठी हे क्षेत्र महत्त्वपूर्ण
देपसांगमध्ये गस्त घालणे भारतासाठी आवश्यक आहे, कारण हे ठिकाण काराकोरम खिंडीनजीक दौलत बेग ओल्डी पोस्टपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. पर्वतीय भागांदरम्यान हा सपाट भूभाग आहे, याचा वापर सैन्य हालचालींसाठी केला जाऊ शकतो. तर डेमचोक सिंधू नदीच्या नजीक असल्याने चीनने तेथे नियंत्रण मिळविले तर उत्तर भारतातील राज्यांमध्ये पाण्याच्या पुरवठ्यावर प्रभाव पडण्याचा धोका होता.