विमानतळावरील टर्मिनलचे 71 टक्के काम पूर्ण
नागरी उड्डाण मंत्रालयाची राज्यसभेत माहिती : एकाचवेळी दोन विमाने हाताळणे सहज शक्य
बेळगाव : सांबरा येथील विमानतळावर उभारण्यात येत असलेल्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम 71 टक्के पूर्ण झाले आहे. सध्या विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. तसेच आंतरराष्ट्रीय विमाने या ठिकाणी आणण्याबाबत विचार झाला नसल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हे उत्तर दिले आहे. बेळगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डिंगचे काम प्रगतीपथावर आहे.
येत्या काही दिवसात ते पूर्ण केले जाणार आहे. या नव्या टर्मिनल बिल्डिंगमुळे एकाचवेळी दोन विमाने हाताळणे सहज शक्य होणार आहे. याबाबत कडाडी यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. मागील काही दिवसांपासून बेळगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देऊन बाहेरच्या देशात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत होती. बेळगावमध्ये धावपट्टी, टर्मिनल बिल्डिंग तसेच प्रवाशांचा प्रतिसाद असल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळाची मागणी करण्यात आली होती. परंतु केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी काम सुरू
बेळगाव विमानतळावर सध्या रनवे ऐंड सेफ्टी एरियाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. सुरक्षित लॅडिंग तसेच इतर सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या विस्ताराचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी हे काम सुरू ठेवण्यात आले आहे.