For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.49 टक्के उत्स्फूर्त मतदान

11:03 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71 49 टक्के उत्स्फूर्त मतदान
Advertisement

सकाळच्यावेळी मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी : दुपारच्या वेळेत मतदान केंद्रांवर काहीकाळ शुकशुकाट

Advertisement

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 7 मे रोजी पार पडली. या मतदारसंघामध्ये 71.49 टक्के उत्स्फूर्त मतदान झाले. गतवेळच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बेळगाव लोकसभा मतदारसंघात 67.70 टक्के मतदान झाले होते. यावेळी 4 टक्क्यांनी अधिक मतदान झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सकाळच्यावेळी मतदारांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. म. ए. समितीचे उमेदवार महादेव पाटील, काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर व भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांची मतदान केंद्रांवर दिवसभर उपस्थिती होती. शिवाय मतदारांना आलेल्या अडचणी सोडविण्यातही पुढाकार घेतला. वाढत्या उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी मतदान केंद्रांवर सकाळच्या वेळेत मतदार बहुसंख्येने दाखल झाले. तथापि दुपारच्या वेळेत मतदान केंद्रांवर काहीसा शुकशुकाट दिसून आला. बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक सुरळीतपणे पार पडली. प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून व जिल्हा प्रशासनानेसुद्धा बरीच जनजागृती केली होती. याशिवाय स्थानिक पातळीवर विविध संस्थांनी मतदानाबाबत जागृती करण्यासाठी रॅलींचे आयोजन केले होते. बेळगाव मतदारसंघामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ येतात. या सर्वच मतदान केंद्रांवर सकाळच्या वेळेत मतदान करणाऱ्यांची संख्या अधिक होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.

सावलीसाठी मतदान केंद्रांवर मंडप, नारळाच्या झावळ्यांची उभारणी

Advertisement

बेळगावसह राज्यातील अनेक शहरांमध्ये उष्णतेची लाट असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. अर्थातच यंदा गतवर्षीच्या तुलनेत उन्हाळा अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे बहुसंख्य मतदारांनी प्रामुख्याने वृद्ध मतदारांनी सकाळच्या वेळेत मतदान करणे पसंत केले. अर्थात मतदारांची गैरसोय होऊ नये व त्यांना उन्हाचा तडाखा जाणवू नये, यासाठी मतदान केंद्रांवर ग्राम पंचायत, सामाजिक कार्यकर्ते यांनी मंडप घालून सावली निर्माण केली होती. त्यामुळे मतदारांमधून समाधान व्यक्त होत होते. काही ठिकाणी नारळाच्या झावळ्या उभ्या करून सावली निर्माण केली होती. काही मतदारसंघांमध्ये स्वागत कमान उभारण्यात आली होती. बहुसंख्य मतदान केंद्रांमध्ये मतदारांचा विचार करून पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली. मतदान करण्यासाठी सकाळी असलेला उत्साह दुपारच्या वेळेत मात्र काहीअंशी ओसरला. पुन्हा पाचनंतर मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शहापूर येथे सकाळपासूनच उत्साह

शहापूर येथे सकाळपासूनच मतदारांचा उत्साह होता. सात वाजण्यापूर्वीच मतदारांनी केंद्रासमोर रांगा लावल्या होत्या. चिंतामणराव हायस्कूल येथे 3 मतदान केंद्रे  होती. या तिन्ही केंद्रांवर मतदारांची बरीच गर्दी झाली होती. सकाळच्या वेळेतच मतदानाची घाई दिसून आली. होसूर येथील एका मतदान केंद्रामध्ये दिव्याची सोय असली तरी पुरेसा उजेड नव्हता. त्यामुळे निवडणूक कर्मचारी मोबाईलच्या टॉर्चमध्ये मतदारयादी तपासत होते. वडगाव जेल शाळेजवळ भाजप-काँग्रेस व म. ए. समिती यांच्या कार्यकर्त्यांनी टेबल थाटले होते. तेथे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुस्कर व उमेदवार महादेव पाटील हे सुद्धा तेथे आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला.

मतदान केंद्रांवर महिलांची संख्या अधिक

शहर आणि तालुक्यातीलही मतदान केंद्रांवर महिलांची संख्या अधिक होती. सध्या पाणीटंचाईचे सावट जाणवत आहे. पाणी मिळविण्यासाठी महिलांची धडपड नेहमीचीच असते. मंगळवारी नेमके काही ठिकाणी नळाला पाणी आले होते. त्यामुळे पाणी भरून घेण्याची कसरत करतानाच महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला.

भरदुपारी मतदान केंद्रांवर शुकशुकाट

उन्हामुळे भरदुपारी मतदान केंद्रांवर शुकशुकाट पसरला. त्यामुळे केंद्रांवर काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या वेळेत भोजन उरकणे पसंत केले. मात्र, शहापूर येथील एका केंद्रावर मतदारांची बरीच लांब रांग लागली होती. तथापि तेथील सर्वच कर्मचारी एकाचवेळी भोजन करीत असल्याचे पाहून नगरसेवक रवी साळुंखे तेथे पोहोचले. जेवण करण्यास काहीच हरकत नाही, परंतु एकाचवेळी सगळ्यांनी जेवण घेत मतदारांना ताटकळत ठेवणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी गोंधळही निर्माण झाला. परंतु मतदारांचा विचार करा, असे साळुंखे यांनी सांगितले व कर्मचाऱ्यांनीही त्वरित काम सुरू केले.

Advertisement
Tags :

.