For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जंतरमंतरवर 700 जणांना अटक

06:38 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
जंतरमंतरवर 700 जणांना अटक
Advertisement

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजेपीचे आंदोलन

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पदत्यागाच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन केले आहे. या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी अनुमती नाकारली आहे. जंतरमंतरवर यावेळी कडोकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 700 हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्यापैकी काहींची नंतर सुटका करण्यात आल्याचे वृत्त आहे. या आंदोलनात आम आदमी पक्षानेही भाग घेतला होता. सीपीआयमच्या वृंदा करातही सहभागी झाल्या. संध्याकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आंदोलनस्थळी उपस्थिती दर्शविली. यावेळी घोषणाबाजी केली गेली.

Advertisement

पोलिस बंदोबस्त कडक असल्याने आंदोलनावर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले, असेही वृत्त आहे. एका वृत्तानुसार 1 हजार हून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यात राजकीय पक्षांच्या काही नेत्यांचाही सहभाग आहे. दक्षतेचा उपाय म्हणून पोलिसांनी जंतरमंतरच्या आसपासची 12 मेट्रो स्थानके बंद ठेवली होती. तसेच दिल्लीतील इंटरनेट व्यवस्था शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. या आंदोलनाला आम आदमी पक्ष, एनएसयुआर, एआयएसए आदी विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला होता. आंदोलकांनी ज्ञानेश कुमार यांच्या पदत्यागाची मागणी केली आहे. तसेच अन्य चार मागण्याही आहेत.

केंद्रीय पोलिस दलेही नियुक्त

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा दलांच्या काही तुकड्याही दिल्लीतील संवेदनशील स्थानी आणि जंतरमंतरच्या आसपास नियुक्त करण्यात आल्या होत्या, आंदोलनाला सकाळी 11 वाजता प्रारंभ करण्यात आला. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण हे देखील आंदोलनस्थळी उपस्थित होते.

डाव्या संघटना अधिक प्रमाणात

या आंदोलनाचा डाव्या संघटनांचा पाठिंबा अधिक प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. तथापि, सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा फारसा नसल्याचेही काही प्रत्यक्षदर्शी पत्रकारांचे म्हणणे आहे. आंदोलकांना पिटाळण्यासाठी पोलिसांनी बळाचा अतिरिक्त उपयोग केला, असा आरोपही कॉक्रोच जनता पार्टीने केला आहे.

Advertisement
Tags :

.