For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यात 70 टक्के ऊस तोडणी पूर्ण

10:12 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यात 70 टक्के ऊस तोडणी पूर्ण
Advertisement

हंगाम अंतिम टप्प्याकडे, कारखान्यांकडून उसाची वेळेत उचल

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यात 3 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रात असलेल्या उसापैकी 2 लाख 15 हजार हेक्टरातील उसाची तोडणी झाली आहे. त्यामुळे ऊस तोडणी हंगाम अंतिम टप्प्यात येऊ लागला आहे. अलिकडच्या काही वर्षांत उसाचे क्षेत्र वाढले आहे. शिवाय जिल्ह्यात असलेल्या कारखान्यांकडून वेळेत उचल होत असल्याने आतापर्यंत 70 टक्के उसाची तोडणी झाली आहे. यंदा नोव्हेंबर दरम्यान साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला प्रारंभ झाला होता.  जिल्ह्यात एकूण 17 साखर कारखाने आहेत. त्यापैकी बहुतांशी साखर कारखान्यांची चिमणी वेळेत पेटली आहे. त्यामुळे उसाची तोडणी आणि उचलही वेळेत झाली आहे. ऊस तोडणीसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून कामगार दाखल झाले आहेत. शिवाय सीमाहद्दीवरील उसाची उचल महाराष्ट्रातील साखर कारखानेच करू लागले आहेत. बेळगाव, चिकोडी, निपाणी, रायबाग, अथणी, गोकाक, मुडलगी, हुक्केरी, खानापूर आदी तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्र अधिक आहे. मात्र यंदा पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने ऊस क्षेत्राला पाण्याची कमतरता जाणवण्याची भिती व्यक्त होत आहे. यासाठी काहींनी उसाची तोडणी घाईगडबडीने संपविली आहे.

नदीकाठावर उसाचे क्षेत्र अधिक

Advertisement

विशेषत: नदीकाठावर उसाचे क्षेत्र अधिक आहे. सर्वाधिक चिकोडी तालुक्यात उसाचे क्षेत्र आहे. त्या पाठोपाठ रायबाग, अथणी, खानापूर, हुक्केरी, गोकाक आदी ठिकाणी ऊस क्षेत्र आहे. मात्र हिरण्यकेशी, मलप्रभा, मार्कंडेय, दूधगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. त्यामुळे उसाला मुबलक पाणी मिळेल की नाही? या चिंतेत ऊस उत्पादक आहेत. विशेषत: मार्कंडेय आणि मलप्रभा नदी काही ठिकाणी कोरडी पडली आहे. त्यामुळे जानेवारीपासूनच पाण्याची चिंता भेडसावू लागली आहे. उसापाठोपाठ भात, सोयाबिन, भुईमूग, मका व इतर पिके आहेत. सीमा हद्दीत असलेल्या उसाची उचल करण्यासाठी कारखान्यांची रस्सीखेच सुरू आहे. नोव्हेंबर दरम्यान उसाच्या एफआरपीसाठी महाराष्ट्रात आंदोलन हाती घेण्यात आले होते. परिणामी कारखान्यांचे गळीत हंगाम एक महिना उशीराने सुरू झाले. मात्र कर्नाटक हद्दीतील उसाची उचल महाराष्ट्रातील कारखान्यांनी प्रथमत: केलेली दिसत आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात 70 टक्के ऊस तोडणी पूर्ण झाली आहे.

येत्या महिन्याभरात हंगाम पूर्णत्वास येणार

3 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 2 लाख 15 हजार हेक्टर क्षेत्रातील उसाची तोडणी झाली आहे. सर्व ऊसाची यंदा वेळेत उचल होणार आहे. 70 टक्के तोडणी पूर्ण झाली आहे. येत्या महिन्याभरात हंगाम पूर्णत्वास येईल.

शिवनगौडा पाटील,सहसंचालक कृषी खाते

Advertisement
Tags :

.