For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वडगावात चेनस्नॅचिंगच्या घटनेत महिलेचे 70 ग्रॅम दागिने लांबविले

12:00 PM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
वडगावात चेनस्नॅचिंगच्या घटनेत महिलेचे 70 ग्रॅम दागिने लांबविले
Advertisement

मंगळसूत्रासह इतर दागिने हिसकावून भामट्याचे पलायन

Advertisement

बेळगाव : श्रावण शुक्रवारनिमित्त नातेवाईकांच्या घरी लक्ष्मीपूजनाला जाऊन आपल्या घरासमोर दुचाकी उभी करताना मोटारसायकलवरून आलेल्या एका भामट्याने महिलेच्या गळ्यातील 70 ग्रॅमचे दागिने पळविले आहेत. शुक्रवारी दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास बाजार गल्ली, वडगाव येथे ही घटना घडली आहे. बाजार गल्ली येथील अनुराधा विनायक सूर्यपान (वय 45) या वडगाव येथील आपल्या नातेवाईकांच्या घरी लक्ष्मीपूजनासाठी गेल्या होत्या. धार्मिक कार्यक्रम आटोपून दुपारी 3.45 वाजण्याच्या सुमारास आपल्या मैत्रिणीला सप्पार गल्लीला सोडून त्या घरी पोहोचल्या. घरासमोर दुचाकी उभी करताना ही घटना घडली आहे.

अनुराधा या आपली दुचाकी उभी करत होत्या. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या भामट्याने त्यांच्या दुचाकीला लाथ मारली. दुचाकीसह त्या खाली पडल्या. हीच संधी साधून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व इतर दागिने हिसकावून घेऊन भामट्याने तेथून पलायन केले. भामट्याने दोन मंगळसूत्रासह 4 लाख 55 हजार रुपये किमतीचे दागिने पळविले आहेत. अनुराधा यांनी आरडाओरड करताच परिसरातील नागरिक जमा झाले. तोपर्यंत भामट्याने तेथून पळ काढला होता. घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस, शहापूरचे पोलीस निरीक्षक एस. एस. सीमानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Advertisement

श्रावणातल्या शेवटच्या शुक्रवारीही चोरी

दि. 16 ऑगस्ट रोजी वरदमहालक्ष्मी पूजनाच्या दिवशी माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात चेनस्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या होत्या. त्यानंतर बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी रात्री 9 वा. महांतेशनगर येथे मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने पळविण्याचा प्रयत्न केला होता. श्रावणातल्या शेवटच्या शुक्रवारीही चेन- स्नॅचिंगची घटना घडली आहे.

Advertisement
Tags :

.