उत्साहपूर्ण वातावरणात 70.81 टक्के मतदान
विधानसभेची सेमिफायनल मतपेटीत बंद : 226 उमेदवारांच्या भवितव्याचा उद्या होणार फैसला
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची सेमिफायनल समजल्या जाणाऱ्या व त्यामुळे तमाम नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचविलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी अत्यंत शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात 70.81 टक्के मतदान झाले. त्याद्वारे एकूण 226 उमेदवारांचे भवितव्य सीलबंद झाले असून उद्या दि. 22 रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या युवा पिढीने अत्यंत उत्साहपूर्वक सहभाग घेतला. त्यात मुख्यमंत्र्यांची कन्या पार्थवी सावंत हिचाही समावेश होता.
जिल्हा पंचायतीसाठी राजकीय स्तरावर झालेल्या या निवडणुकीसाठी भाजपसह मगो, काँग्रेस, आप, फॉरवर्ड, आरजी आणि अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यांच्यासाठी उत्तर गोव्यातून सुमारे 72.66 टक्के तर दक्षिण गोव्यातून 68.93 टक्के मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत सर्वसाधारण नागरिकांसह दिव्यांग, ज्येष्ठ, वयोवृद्ध, तसेच तृतीयपंथी मतदारांनीही आपले कर्तव्य बजावले.
रविवारी सकाळी 8 वाजता 1,284 बुथवर मतदानास प्रारंभ झाला. सकाळच्या प्रहरात 10 वाजेपर्यंत मतदारांचा प्रतिसाद एकदमच नगण्य नसला तरीही अपेक्षेप्रमाणे कमीच म्हणजे सुमारे 20 टक्के एवढाच होता. त्यानंतर 12 वाजेपर्यंत 31 ते 33 टक्के एवढेच मतदान झाल्याचे दिसून आले. दुपारनंतर मात्र त्यात वाढ होत गेली व 4 वाजेपर्यंत ती टक्केवारी जवळजवळ दुप्पट होत 63.59 टक्क्यांवर पोहोचली. त्यापैकी उत्तर गोव्यात 65.34 टक्के तर दक्षिण गोव्यात 61.78 टक्के एवढे मतदान झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील पाळी मतदारसंघात सर्व मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडले. त्याची फलश्रृती म्हणून काही बुथवर सायंकाळी 4 नंतर ही टक्केवारी 83 टक्के पार केल्याचे दिसून आले. काही ठिकाणी मात्र तोपर्यंत 50 टक्केही मतदान झाले नव्हते.
सकाळच्या वेळी अपवाद वगळता बहुतेक बुथवर किरकोळ उपस्थिती दिसून आली तर सायंकाळच्या सत्रात मात्र अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. दरम्यान, वर्ष 2020 मध्ये झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत 56.86 टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत कालच्या निवडणुकीत ही टक्केवारी सरासरी 15 टक्क्यांनी वाढली असून मतदारांनी कोणता पक्ष आणि कोणत्या उमेदवाराला कौल दिला आहे ते सोमवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. 
कामगारवर्गाची 4 नंतर मतदान केंद्रांवर गर्दी
शनिवार हा मतदानाचा दिवस असला तरी खासगी आस्थापनांसाठी तो कामाचा दिवस होता. सरकारने भरपगारी सुट्टी जाहीर केलेली असली तरी ती सक्तीने आणि खरोखरच दिली जाते यावर वचक ठेवण्याची यंत्रणा किंवा तसा दरारा नसल्यामुळे अनेक कारखाने, आस्थापने यांनी कर्मचाऱ्यांना तशी सुट्टी देण्यास एक तर थेट नकारच दिला होता किंवा एक दोन तास उशिरा येण्याची सूट दिली होती. त्यामुळे झंझट नको म्हणून कामगारवर्ग रोजच्याप्रमाणे आपापल्या नोकरीधंद्यावर ऊजू झाला. अशा मतदारांमुळे सायंकाळी 4 वाजल्यानंतर अनेक बुथवर मोठी गर्दी दिसून आली. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांच्या कपाळावर आट्याही वाढल्याचे दिसून आले.
बर्च अग्नितांडवाची झळ बाधणार की विरणार?
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तोंडावरच हणजूण येथे बर्च क्लबमध्ये आगीची महाभयानक दुर्घटना घडली व त्यात 25 जणांचे बळी गेले. त्याचे खापर विरोधकांनी सरकारच्या माथी फोडले व वरपासून खालपर्यंत सरकारी यंत्रणांनी मुक्तहस्ते खतपाणी घातल्यामुळे हा बेकायदेशीरपणा रसरशीत वाढला, अशी टीका केली होती. त्याचा परिणाम निवडणुकीवर होईल, अशी सुप्त भीती भाजप गोटात दिसून येत होती. मात्र ती खरोखरच संताप किंवा विरोधाच्या माध्यमातून मतपेटीत सीलबंद झालेली आहे की नाही याचा उलगडा सोमवारीच होणार आहे.
उत्तर गोव्यात 72.66 टक्के कौल
उत्तर गोव्यात हरमल मतदारसंघात 80.43 टक्के मतदान झाले. मोरजी 72.59 टक्के, धारगळ 76.40 टक्के, तोरसे 76.02 टक्के, शिवोली 69.12 टक्के, कोलवाळ 76.09 टक्के, हळदोणा 66.49 टक्के, शिरसई 65.88 टक्के, हणजूण 72.67 टक्के, कळंगुट 66.87 टक्के, सुकूर 64.93 टक्के, रेईश-मागूश 64.74 टक्के, पेन्ह-द-फ्रान्स 64.32 टक्के, सांताक्रुझ 64.98 टक्के, ताळगाव 59.44 टक्के, चिंबल 66.78 टक्के, खोर्ली 68.46 टक्के, सेंट लॉरेन्स 63.98 टक्के, लाटंबार्से 88.29 टक्के, कारापूर-सर्वण 79.40 टक्के, मये 79.69 टक्के, पाळी 86.58 टक्के, होंडा 85.53 टक्के, केरी 87.99 टक्के आणि नगरगांव 86.71 टक्के असे एकूण 72.66 टक्के मतदान नोंद झाले.
दक्षिण गोव्यात 68.93 टक्के नोंद
दक्षिण गोव्यात उसगाव-गांजे मतदारसंघात 82.84 टक्के, बेतकी-खांडोळा 81.32 टक्के, कुर्टी 74.67 टक्के, वेलिंग-प्रियोळ 73.23 टक्के, कवळे 68.63 टक्के, बोरी 72.83 टक्के, शिरोडा 73.49 टक्के, राय 59.23 टक्के, नुवे 62.72 टक्के, कोलवा 59.97 टक्के, वेळ्ळी 56.52 टक्के, बाणावली 59.70 टक्के, दवर्ली 65.78 टक्के, गिरदोली 70.75 टक्के, कुडतरी 60.26 टक्के, नावेली 55.29 टक्के, सावर्डे 79.21 टक्के, धारबांदोडा 78.79 टक्के, रिवण 78.98 टक्के, शेल्डे 72.57 टक्के, बार्शे 80.19 टक्के, खोल 73.77 टक्के, पैंगीण 76.36 टक्के, सांकवाळ 63.99 टक्के आणि कुठ्ठाळी 56.96 टक्के असे एकूण 68.93 टक्के मतदान नोंद झाले.