मक्याची पोती अंगावर कोसळून 7 कामगार ठार
अलियाबाद औद्योगिक वसाहतीतील घटना
वार्ताहर /विजापूर
मक्याची पोती अंगावर कोसळल्याने सात कामगार ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना विजापूर शहराजवळील अलियाबाद येथील औद्योगिक क्षेत्रातील राजगुरु इंडस्ट्रीजच्या गोदामात घडली. कृष्ण किसनकुमार (वय 26), राजेशकुमार मुकिया (वय 26), संबु मुकिया (वय 43), लुको यादव (वय 42), रामब्रीद्र मुकिया (वय 45), रामबालाक मुकिया (वय 43) आणि दुल्हारा चंद मुकिया (वय 58) अशी मृतांची नावे आहेत. तर सोनू करमचंद, रविंशकुमार, अनिल, कळमेश्वर मुकिया, किशोर हंजरीमल जैन आणि प्रकाश भडकल अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व कामगार बिहार राज्यातील आहेत. विजापूर शहराजवळील अलियाबाद येथील औद्योगिक क्षेत्रातील राजगुरु इंडस्ट्रीजच्या गोदामात साठवलेल्या मक्याच्या पोत्यांवर मोठे यंत्र पडले. तेथे काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर मक्याची पोती पडल्याने सात कामगार मृत्युमुखी पडले. त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर सर्व मृतदेह विमानाने बिहार राज्यातील त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मक्का प्रक्रिया प्रकल्पात विविध ठिकाणचे कामगार काम करत आहेत.
मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 7 लाख ऊ. भरपाई
मृत्युमुखी पडलेल्या दुर्देवी कामगारांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्यावतीने प्रत्येकी सात लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले.