वॉशिंग्टनचे 7 बळी, अश्विनचाही दरारा
पुण्याच्या खेळपट्टीवर फिरकीची जादू : फिरकीच्या जाळ्यात किवीज संघ पुरता अडकला, संपूर्ण संघ 259 धावांवर ऑलआऊट झाला: टीम इंडियाचीही खराब सुरुवात, दिवसअखेरीस 1 बाद 16
सुकृत मोकाशी/पुणे
पहिल्या कसोटीमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर टीम इंडियाने दुस्रया कसोटीमध्ये जोरदार पुनरागमन केले. पुण्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत पाहुण्या न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात अवघ्या 259 धावांमध्ये गुंडाळत कसोटीवर मजबूत पकड मिळवली. वॉशिंग्टन सुंदर हा पुणे कसोटीतील पहिल्या दिवसाचा हिरो ठरला. त्याने किवी संघाच्या 7 फलंदाजांना बाद करून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. विशेष म्हणजे, फिरकीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर वॉशिंग्टन सुंदर व अश्विन या दोघांनी 10 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. यानंतर सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी सावध खेळ करत उर्वरित षटके खेळून काढली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 1 बाद 16 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारत 243 धावांनी पिछाडीवर आहे.
प्रारंभी, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात लॅथम आणि कॉनवे यांनी केली. मात्र, आठव्या शतकात लॅथमला (15) अश्विनने बाद करत टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. विल यंगलाही (18) अश्विनने बाद करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. यानंतर डेव्हॉन कॉनवे व रचिन रविंद्र यांनी 62 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. कॉनवेने अर्धशतकी खेळी साकारताना 11 चौकारासह 76 धावा फटकावल्या. त्याला अश्विनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
वॉशिंग्टन सुंदरचे 7 बळी
बेंगळूरमधील मॅन ऑफ द मॅच ठरलेला रचिन रवींद्र पुण्यातही फॉर्मात दिसला, तो शतक करेल असे वाटत होते, पण तो वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीत अडकला आणि 65 धावा करून क्लीन बोल्ड झाला. तत्पूर्वी त्याने डॅरेल मिचेलसोबत अर्धशतकी भागीदारी केली. रविंद्रने 105 चेंडूत 5 चौकार व 1 षटकारसह 65 धावांचे योगदान दिले. यानंतर टॉम ब्लंडेल व मिचेललाही सुंदरने पाठोपाठ बाद करत किवी संघाची अवस्था 6 बाद 204 अशी केली. ग्लेन फिलिप्स काही विशेष करू शकला नाही आणि त्यालाही सुंदरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर सुंदरने टीम साऊदी (5), एजाज पटेल (4) आणि मिचेल सँटनर (33) यांना बाद करत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. विशेष म्हणजे, 3 बाद 197 अशा सुस्थितीत न्युझीलंड दिसत असताना वॉशिंग्टनच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव अवघ्या 259 धावांमध्ये आटोपला. किवी संघाने अवघ्या 62 धावांत 7 फलंदाज गमावले. टीम इंडियाकडून सुंदरने 23.1 षटकात 59 धावा देत एकूण 7 विकेट घेतल्या. अश्विनने 64 धावांत 3 बळी मिळवले.
भारताची खराब सुरुवात
कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. पण, वेगवान गोलंदाज टीम साऊदीसमोर रोहित पुन्हा एकदा फेल ठरला. साऊदीने त्याला भोपळाही फोडू दिला नाही. रोहित बाद झाल्यानंतर जैस्वाल व शुभमन गिल यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसअखेरीस भारताने 11 षटकांत 1 गडी गमावत 16 धावा केल्या. जैस्वाल 1 चौकारासह 6 तर गिल 1 चौकारासह 10 धावांवर खेळत होता. भारतीय संघ अद्याप 243 धावांनी पिछाडीवर असून आज दुसऱ्या दिवशी फलंदाजांवर मदार असणार आहे.
पुणे कसोटीत अश्विनचा डबल धमाका
न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने तीन बळी घेत डबल धमाका केला आहे. या तीन बळीसह अश्विन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या यादीत त्याने ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनला मागे टाकले. अश्विनने 2019 पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इतिहासातील 39 व्या सामन्यात 189 विकेट्स घेत नॅथन लियॉनला मागे टाकले. नॅथनने 43 सामन्यात 187 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अश्विन नॅथनला मागे टाकत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा सातवा आणि पहिला सक्रीय गोलंदाज ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
- मुथय्या मुरलीधरन 800
- शेन वॉर्न 708
- जेम्स अँडरसन 704
- अनिल कुंबळे 619
- स्टुअर्ट ब्रॉड 604
- ग्लेन मॅकग्रा 563
- रविचंद्रन अश्विन 531
- नॅथन लियॉन 530.
तीन वर्षांनी संघात परतला, पुण्याच्या खेळपट्टीवर थेट धमाकाच केला!
फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने तब्बल तीन वर्षानंतर कसोटीत कमबॅक करताना न्यूझीलंडविरुद्ध जोरदार धमाका केला. पुण्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने सात विकेट्स घेण्याची किमया केली. कसोटीत तो पहिल्यांदाच पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्यात यशस्वी ठरला. विशेष म्हणजे, सुंदरने एक-दोन नव्हे तर न्यूझीलंडच्या 7 विकेट घेतल्या, ज्यात त्याने 5 फलंदाजांना क्लीन बोल्ड केले. या सामन्यात संघासाठी डोकेदुखी ठरलेल्या रचिन रवींद्रला क्लीन बोल्ड करत त्याने पहिलीच कमाल विकेट मिळवली. यानंतर लागोपाठ विकेट घेत किवीज संघाला गुंडाळले. 59 धावांत 7 बळी घेत आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. 2021 मध्ये त्याने शेवटची कसोटी खेळली होती.
वॉशिंग्टन सुंदरचा जबरदस्त स्पेल
- रचिन रवींद्र क्लीन बोल्ड
- डॅरिल मिचेल पायचीत
- टॉम ब्लंडल क्लीन बोल्ड
- ग्लेन फिलिप्स अश्विनकडून झेलबाद
- मिचेल सँटनर क्लीन बोल्ड
- टीम साऊदी क्लीन बोल्ड
- एजाज पटेल क्लीन बोल्ड
पुणे कसोटीत भारतीय फिरकीपटूंचा जलवा
पुणे कसोटीत रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन्ही चेन्नईच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला तंबूत धाडले. 2021 नंतर कसोटी संघात पुनरागमन केलेल्या सुंदरने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच चकित केले. वॉशिंग्टन सुंदरने अश्विनबरोबर भेदक गोलंदाजी करत आपल्या तालावर किवी फलंदाजांना नाचवले. भारताच्या दोन्ही ऑफस्पिन गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनी सामन्यात संपूर्ण 10 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी फिरकीपटूंनी 10 विकेट्स घेतल्या आहेत. पण फिरकीतही ऑफस्पिन गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनी कसोटी सामन्यात संपूर्ण 10 विकेट्स घेण्याची ही कसोटी इतिहासात पहिलीच वेळ आहे. याआधी, 2024 मध्ये इंग्लंडविरूद्ध सामन्यात जडेजा, अश्विन आणि कुलदीप या तिघांनी 10 विकेट्स घेतले होते. याशिवाय, भारतीय फिरकीपटूंनी 1952, 1956, 1964 व 1973 मध्ये असा कारनामा केला आहे.
भारतात कसोटीच्या पहिल्या दिवशी स्पिनर्सनी 10 बळी घेतलेले सामने
- भारत वि न्यूझीलंड, पुणे 2024
- भारत वि इंग्लंड, धरमशाला 2024
- भारत वि इंग्लंड, चेन्नई 1973
- भारत वि ऑस्ट्रेलिया, चेन्नई 1964
- भारत वि ऑस्ट्रेलिया, कोलकाता 1956
- इंग्लंड वि भारत, कानपूर 1952
रोहित शर्मा टीम साऊदीसमोर पुन्हा हतबल
पुणे कसोटीत भारताच्या डावातील तिसऱ्या षटकात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने भारतीय कर्णधार रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम साऊदीने रोहितला आतापर्यंत 14 वेळा बाद केले आहे. तसेच आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडानेही रोहितला 14 वेळा बाद करण्यात यश मिळवले आहे. तसेच श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने 10 वेळा तर नॅथन लियॉनने 9 वेळा त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाद केले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
- आर. अश्विन (भारत) - 39 सामन्यात 189 बळी
- नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया) - 43 सामन्यात 187 बळी
- पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) - 42 सामन्यात 175 बळी
- मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) - 38 सामन्यात 147 बळी.