जून तिमाहीत ‘अॅपल’च्या उत्पन्नात 7 टक्के वाढ
सीईओ टीम कुक यांची माहिती : 21 अब्ज डॉलरची कमी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आयफोन निर्माती कंपनी अॅपलने एप्रिल ते जून या कालावधीतील तिमाही निकाल नुकताच जाहीर केला असून उत्पन्नामध्ये 7 टक्के वाढ कंपनीने नोंदवली आहे. कंपनीने सदरच्या तिमाहीत 21.44 अब्ज डॉलरची कमाई केली आहे.
एक वर्षाच्या आधी याच अवधीत 19.8 अब्ज डॉलरची कमाई करण्यात आली होती. एप्रिल-जूनच्या तिमाहीत कंपनीची निव्वळ विक्री 4.8 टक्के वाढत 85.77 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी राहिली. अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी ही माहिती दिली आहे.
या देशांकडून कमाई
कंपनीने जूनअखेरच्या तिमाहीत 85.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका विक्रमी महसूल प्राप्त केला आहे, जो मागच्या तुलनेमध्ये पाच टक्के अधिक आहे. कॅनडा, मेक्सिको, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि थायलंड यांच्यासह 24 देशांमध्ये तिमाही दरम्यान विक्रमी महसूल कंपनीने प्राप्त केल्याची माहिती सीईओ टीम कुक यांनी दिली. भारत, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि थायलंडमधील महसूल एप्रिल-जून तिमाहीत मागच्या वर्षाच्या तिमाहीच्या तुलनेमध्ये 76 कोटी डॉलरने वाढला आहे.
आयपॅड विक्री वधारली
याचदरम्यान आयफोनच्या विक्रीमध्ये एक टक्का घसरण झाली असून 39.29 अब्ज डॉलर्सचे आयफोन विक्री करण्यात आले आहेत. अॅपलच्या मॅकबुकच्या विक्रीमध्ये वर्षाच्या आधारावर दोन टक्के वाढ झाली असून यातून 7 अब्ज डॉलर कंपनीला प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आयपॅडची विक्रीसुद्धा 24 टक्के वाढत 7.16 अब्ज डॉलर्सची झाली आहे.