सिलिंडर स्फोटातील मृताच्या नातेवाईकांना 7 लाखांची भरपाई
जिल्हा ग्राहक न्यायालयाचा निकाल : सिलिंडर दुर्घटनेत नुकसान मिळण्याची पहिलीच घटना
बेळगाव : गॅस सिलिंडरच्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या तऊणाच्या नातेवाईकांना 7 लाख रुपयांची आर्थिक नुकसानभरपाई देण्याचा आदेश ग्राहक न्यायालयाने विमा कंपनीला बजावला आहे. सिलिंडर स्फोट प्रकरणात नुकसानभरपाई मिळण्याची आजपर्यंतची ही पहिलीच घटना आहे. श्रीधर शिवाप्पा पॅटी (वय 19) रा. नागनूर (ता. मुडलगी) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो बीएससी नर्सिंगचा विद्यार्थी होता. त्याचे आई-वडील शिक्षक असून ते परगावी गेले होते. त्यामुळे 28 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4 च्या दरम्यान श्रीधर चहा करण्यासाठी म्हणून स्वयंपाक खोलीत गेला. गॅस शेगडीचे स्विच ऑन करून लाईटर पेटवताच आगीचा भडका उडाला. तसेच सिलिंडरचा स्फोट झाला.
यामध्ये श्रीधर गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी इस्पितळाकडे नेण्यात येताना वाटेतच मृत्यू झाला. रेग्युलेटरमधून गॅस लिकेज झाल्याने या घटनेला गॅस कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना भरपाई द्यावी, असा खटला अॅड. एन. आर. लातूर यांनी ग्राहक न्यायालयात दाखल केला होता. हिंदुस्तान पेट्रोलियमकडून दरवषी 40 करोड 68 लाख 64 हजार रुपये इतकी रक्कम इन्शुरन्स कंपनीला भरली जाते. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना इन्शुरन्स कंपनीकडून आर्थिक भरपाई देण्यात यावी, असा दावा अॅड. एन. आर. लातूर यांनी न्यायालयात केला. त्यानुसार न्यायालयाने मृताच्या नातेवाईकांना इन्शुरन्स कंपनीने सात लाख ऊपयांची आर्थिक भरपाई द्यावी, असा निकाल दिला आहे. केवळ मृत्यू झाल्यावरच नव्हेतर जखमी किंवा घराचे नुकसान झाले. तरीही न्यायालयात दावा दाखल करता येतो, असे अॅड. एन. आर. लातूर यांनी सांगितले.