कोळसा खाणीतील स्फोटात प. बंगालमध्ये 7 मजूर ठार
डिटोनेटर घेऊन जात असताना स्फोट
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील एका कोळशाच्या खाणीत सोमवारी स्फोट झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी 10.30 वाजता भादुलिया ब्लॉकमधील कोळसा खाणीत ही घटना घडली. पश्चिम बंगाल पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने खाणीत झालेल्या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोळसा खाणींमध्ये स्फोट करण्यासाठी डिटोनेटर्सची वाहतूक केली जात असताना हा स्फोट झाला. स्फोटाचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. भाजप नेते आणि स्थानिक आमदार अनूप साहा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सुरुवातीला पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाल्याचे सांगितले. जखमींपैकी आणखी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुरेशी खबरदारी न घेता ट्रकमधून स्फोटक साहित्याची वाहतूक व हाताळणी केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्फोटात ठार झालेले लोक खाण चालवणाऱ्या एजन्सीचे कर्मचारी होते.