रशियाच्या ड्रोन हल्ल्यात युक्रेनमध्ये 7 जणांचा मृत्यू
युद्धबंदीच्या चर्चेदरम्यान 147 ड्रोन डागले
वृत्तसंस्था/ कीव
रशियाने रात्रभर युक्रेनच्या विविध भागांवर ड्रोन हल्ले करत कीवसह अनेक निवासी इमारतींना लक्ष्य केले. स्थानिक युक्रेनियन अधिकारी आणि आपत्कालीन सेवांनुसार, शनिवारी रात्री रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान सात जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात कीव शहरातील निप्रोव्स्की जिल्ह्यात दोन निवासी इमारतींना आग लागली. राजधानी रात्रभर अनेक स्फोटांनी हादरली. यादरम्यान हवाई संरक्षण युनिट्स शहरात सक्रिय राहिली.
युक्रेनियन हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, रशियाने युक्रेनवर 147 ड्रोन सोडले. यापैकी युक्रेनियन हवाई संरक्षण दलाने 97 विमाने पाडला. तर युक्रेनियन प्रतिउपायांमुळे अन्य 25 विमाने लक्ष्यापर्यंत पोहोचू शकली नाहीत. हे हल्ले खार्किव्ह, सुमी, चेर्निहिव्ह, ओडेसा आणि डोनेत्स्क प्रदेश तसेच राजधानी कीवमध्ये झाले. कीववर झालेल्या ड्रोन हल्ल्यात पाच वर्षांच्या मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला आणि 10 जण जखमी झाले, असे शहराच्या लष्करी प्रशासनाने सांगितले. ड्रोन हल्ल्यांमुळे शहराच्या इतर जिह्यांमध्ये काही ठिकाणी आग लागल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले. निप्रोव्स्की जिह्यातील एका मोकळ्या जागेत आग लागली, तर शेवचेनकिव्स्की जिल्ह्यात एका कारचे नुकसान झाले.