For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तान-ग्वादरमध्ये गोळीबारात 7 ठार

07:00 AM May 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तान ग्वादरमध्ये गोळीबारात 7 ठार
Advertisement

झोपेत असतानाच हल्ला : दहशतवाद्यांकडून भ्याड कृत्य : अज्ञाताचे पलायन

Advertisement

वृत्तसंस्था /इस्लामाबाद

पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये गुऊवारी सकाळी अज्ञात हल्लेखोराने 7 जणांची गोळ्या झाडून हत्या केली. पाकिस्तानी न्यूज चॅनल जिओ न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, सर्व लोक झोपलेले असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक जण जखमीही झाला आहे. मृत हे पाकिस्तानातील पंजाब येथील रहिवासी आहेत. मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला असून घटनेची चौकशी केली जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी या घटनेला देशाच्या शत्रूंचे भ्याड कृत्य म्हटले आहे. तसेच ‘आम्ही दहशतवाद मुळापासून नष्ट करू’ असेही शरीफ म्हणाले. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. गुरुवार, 9 मे रोजी सकाळी हल्लेखोर घरात घुसला आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ग्वादरपासून 25 किलोमीटर अंतरावर गोळीबाराची घटना घडली आहे. ग्वादर हे बलुचिस्तान प्रांताच्या दक्षिण-पश्चिम भागात स्थित आहे. या शहराच्या सीमा अफगाणिस्तान आणि इराणला लागून आहेत. या हल्ल्यापूर्वीही बलुच लिबरेशन आर्मीने अशाचप्रकारे परिसरातील मजुरांना लक्ष्य केले होते. ग्वादरमध्ये चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह अंतर्गत बांधण्यात आलेला पाकिस्तानचा सर्वात मोठा आर्थिक कॉरिडॉर हे या हल्ल्याचे एक कारण आहे. किंबहुना, बलुचिस्तानमधील नैसर्गिक संसाधनांमध्ये अधिक वाटा या मागणीसाठी फुटीरतावादी दीर्घ काळापासून सरकारशी लढा देत आहेत. अशा परिस्थितीत चिनी कंपन्या त्यांच्या संसाधनांवर कब्जा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Advertisement

बलुचिस्तान मुख्यमंत्र्यांनी केला हल्ल्याचा निषेध

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सर्फराज बुगती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. दोषींना सोडले जाणार नाही आणि गोळीबारात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत केली जाईल, असे बुगती यांनी म्हटले आहे. आम्ही दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांचा शोध घेणार आहोत. त्यांना पकडण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर झिया उल्लाह लंगाऊ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले.

तीन आठवड्यांपूर्वी 11 जणांची हत्या

या हल्ल्याच्या तीन आठवड्यांपूर्वी बलुचिस्तानमधील नुष्की जिह्यात अज्ञात हल्लेखोरांनी 11 जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. हल्लेखोरांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी लोकांवर गोळीबार केला होता. बसमधील 9 जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. याशिवाय 20 मार्च रोजीही काही हल्लेखोर बंदुकांसह ग्वादर पोर्ट अथॉरिटी (जीपीए) कॉलनीत घुसले होते. मात्र, या हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. सुरक्षा जवानांनी हल्लेखोरांना ठार केले होते.

Advertisement
Tags :

.