चर्चमधील गोळीबारात जॉर्डनमध्ये 7 ठार
वृत्तसंस्था/ अम्मान
जॉर्डनच्या दक्षिणेकडील करक प्रांतात शुक्रवारी रात्री चर्च परिसरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने घबराट पसरली. यात किमान 7 जण जागीच ठार झाले, तर 10 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. ही घटना राजधानी अम्मानपासून सुमारे 145 किलोमीटर अंतरावर असलेल्या हमुद शहरातील ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये घडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हल्लेखोरांनी अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या लोकांवर अनेक मिनिटे गोळीबार केला. या अचानक झालेल्या गोळीबारामुळे घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच, जॉर्डनच्या सुरक्षा दलांनी परिसर सील केला आणि हल्लेखोरांचा शोध सुरू केला.
हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून अल-ममलकाने प्रसारित केलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये तीन बंदुकधारी फुटपाथवरून चर्चच्या दिशेने गोळीबार करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला होता. हल्लेखोर चर्चच्या प्रवेशद्वाराकडे धावण्यापूर्वी झाडांमागे आणि एका छोट्या भिंतीमागे लपताना दिसत आहेत.
