इराणसाठी हेरगिरी करणाऱ्या 7 इस्रायलींना अटक
आरोपींमध्ये सैनिकाचाही समावेश : हेरांनी पाठविलेल्या माहितीच्या आधारावर हिजबुल्लाहकडून हल्ले
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायलमध्ये इराणसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली 7 इस्रायली नागरिकांना अटक करण्यात आली आहे. इराणसाठी 2 वर्षांपर्यंत हेरगिरी करत त्याच्यासाठी शेकडो कामे केल्याचा आरोप या सर्वांवर आहे. हे अत्यंत गंभीर प्रकरण असून आरोपींना याप्रकरणी मृत्युदंड ठोठावला जाऊ शकतो. हे सर्व आरोपी हाइफा किंवा उत्तर इस्रायलचे रहिवासी आहेत. आरोपींमध्ये एका सैनिकाचा समावेश असून तो काही वर्षांपूर्वी सैन्याच्या सेवेतून पळाला होता. याचबरोबर आरोपींमध्ये 16-17 वयोगटातील 2 अल्पवयीनांचा समावेश असल्याचे इस्रायलच्या पोलीस विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
या आरोपींनी दोन वर्षांमध्ये सुमारे 600 मिशन्स पूर्ण केल्या आहेत. आरोपी पैशाच्या आमिषापोटी इराणसाठी गोपनीय माहिती जमवित होते. त्यांनी इस्रायलच्या सैन्य ठिकाणांपासून अण्वस्त्रs, दारूगोळ्याची माहिती इराणला पुरविली आहे. या माहितीच्या आधारावरच इराणने इस्रायलमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आयर्न डोम, आण्विक प्रकल्पाची जमविली माहिती
संशयितांवर तेल अवीवमध्ये संरक्षण मुख्यालय आणि नेवातिम तसेच रमत डेव्हिड विमानतळासमवेत आडीएफ तळांची छायाचित्रे काढणे आणि माहिती जमविल्याचा आरोप आहे. या ठिकाणांना लक्ष्य करत हिजबुल्लाह आणि इराणने हवाई हल्ले केले होते. नेवातिम तळावर इराणने 1 ऑक्टोबर रोजी दोन क्षेपणास्त्रs डागली होती. तर रमत डेव्हिडवर हिजबुल्लाहने केला होता. संशयितांनी गॅलिलीमध्ये फुग्याद्वारे सैन्यतळाची छायाचित्रे काढली होती. तसेच या ठिकाणी सुमारे महिन्याभरानंतर हिजबुल्लाहकडून क्षेपणास्त्र हल्ला झाल होता. आरोपींनी आयर्न डोम, बंदर, वायुदल, नौदलाचे तळ तसेच हेडेरा ऊर्जा प्रकल्प यासारख्या ठिकाणांचीही माहिती जमविली होती. आरोपींकडून इराणी हस्तकांसाठी जमविण्यात आलेली सामग्री आम्ही जप्त केली असून यात छायाचित्रे आणि व्हिडिओ सामील असल्याचे इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
तुर्कियेच्या मध्यस्थाच्या संपर्कात
सर्व आरोपी 2 वर्षांपर्यंत तुर्कियेच्या एका मध्यस्थाच्या संपर्कात होते. त्यांनी सर्व गोपनीय माहिती त्याच्याच माध्यमातून इराणपर्यंत पोहोचविली आहे. पुरविलेल्या गोपनीय माहितीमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकते याची कल्पना आरोपींना होती. ही गोपनीय माहिती शत्रूला मिळाल्याने इस्रायलला आतापर्यंत किती नुकसान पोहोचले हे आम्ही जाणून घेत आहेत. पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याशी या आरोपींचा संबंध आहे का हे देखील पडताळून पाहत आहोत असे इस्रायलच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.
लाखो डॉलर्स मिळाले
या आरोपींनी इराणला इस्रायलच्या शस्त्रास्त्रांची क्षमता आणि त्याच्या अचूकतेविषयी देखील माहिती पुरविली होती. याकरता या आरोपींना लाखो डॉलर्स देण्यात आले होते. यातील काही रक्कम क्रिप्टोकरन्सीमध्ये होती. तर रोख रक्कम रशियन पर्यटकांच्या माध्यमातून आरोपींना प्राप्त झाल्याचे समजते. संशयितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. कार्यवाही पूर्ण होईपर्यंत आरोपींना कोठडीत ठेवण्याची अनुमती न्यायालयाकडे मागण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मृत्युदंड ठोठावण्यात यावा
आरोपींनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हेरगिरी केली होती. या संशयितांवर इस्रायली नागरिकांविषयी माहिती जमविल्याचाही आरोप आहे. यात एक उच्चस्तरीय संरक्षण अधिकारी देखील सामील असून संशयिताकडे त्याचे छायाचित्र मिळाले आहे. या आरोपींनी अधिकाऱ्याचा पाठलाग केला होता. तसेच त्याच्या मुलांवरही नजर ठेवली होती. या अधिकाऱ्याची हत्या करण्याचा त्यांचा प्रयत्न होता असे सिन बेत या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. इस्रायलचे मंत्री मिकी जोहर यांनी या आरोपींना मृत्युदंड ठोठावण्याची मागणी केली आहे. आम्ही अस्तित्वासाठी लढत असताना अशा देशद्रोह्यांना एकच शिक्षा मिळायला हवी असे त्यांनी म्हटले आहे.