होर्मुझ मार्ग खुला करण्याची चावी ठरणार 7 बेटं
इराणचे आहे नियंत्रण : अमेरिकेचे सैन्य करणार कब्जा
इराणमध्ये युद्ध सुरु झाल्यापासून होर्मुझ सामुद्रधुनी सातत्याने चर्चेत आहे. इराणच्या सैन्याचे या भागावर नियंत्रण आहे. तर या सागरी मार्गाला जागतिक व्यापारासाठी खुला करण्याचा दबाव अमेरिकेवर आहे. याचदरम्यान अमेरिकेचे हजारो सैनिक पश्चिम आशियात दाखल झाले आहेत. अमेरिकेचे हे सैनिक उत्तर पर्शियन उपसागातील इराणच्या खार्ग बेटावर कब्जा करण्याचा प्रयत्न करू शकतात असे मानले जातेय. या बेटावरून इराणच्या 90 टक्के कच्च्या तेलाची निर्यात होते. या बेटावर कब्जा करत होर्मुझमधील वाहतूक पूर्ववत करता येईल असे अमेरिकेचे मानणे आहे. खार्ग हे इराणच्या अनेक बेटांपैकी एक आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमधून जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अन्य बेटंही महत्त्वपूर्ण ठरू शकतात. यात 7 बेटांचा समावेश असून ती होर्मुझचे कोडं सोडविण्यासाठी ‘चावी’ ठरू शकतात.
ही 7 बेट अबू मूसा, ग्रेटर तुंब, लेसर तुंब, हेंगम, केश्म, लारक आणि होर्मुझ असून त्यांना चीनच्या सन यात-सेन युनिव्हर्सिटीचे संशोधक ‘इराणचा आर्क डिफेन्स’ संबोधितात. खार्गपेक्षाही महत्त्वपूर्ण ही 3 बेटं या बेटांना जोडणारी एक काल्पनिक रेषा होर्मुझ सामुद्रधुनीला नियंत्रित करण्यात इराणच्या रणनीतिक आघाडीला समजण्यास मदत करतात. अबू मूसा, ग्रेटर तुंब आणि लेसर तुंब सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ही या 7 बेटांमध्ये सर्वात छोटी असून आर्कच्या पश्चिम टोकावर आहेत असे इराणी संशोधक इनायतुल्लाह यजदानी अन् चिनी संशोधक मा यान्जे यांचे सांगणे आहे. या बेटांदरम्यान मर्यादित अंतर आणि उथळ सागरामुळे मोठी जहाजं आणि टँकर्सना या तीन बेटांजवळून जाणे भाग पडते. यामुळे ती आयआरजीसीच्या हल्ला करणाऱ्या भरधाव नौका, सुरूंग पेरणाऱ्या नौका आणि ड्रोन्सच्या सहजपणे लक्ष्य ठरू शकतात.
अमेरिकेसाठी सोपे नसणार
ही बेटं रणनीतिक स्वरुपात अशा ठिकाणी आहेत, जेथून आखातून बाहेर पडणे किंवा त्यात दाखल होणाऱ्या कुठल्याही जहाजाला नियंत्रित केले जाऊ शकते. इराणला या क्षेत्रावर नियंत्रणाचा थेट लाभ वर्तमान युद्धात मिळत असल्याचे हवाई येथील विश्लेषक आणि अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडच्या जॉइंट इंटेलिजेनस सेंटरचे माजी संचालक कार्ल शूस्टर यांचे सांगणे आहे. यातील कुठल्याही क्षेत्राला नियंत्रित करण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याला इराणच्या मुख्य भूमीवरून येणारे ड्रोन, क्षेपणास्त्रs अन् तोफखान्याच्या हल्ल्यांना रोखावे लागेल असे न्यूयॉर्क येथील सूफान सेंटरच्या अहवालात म्हटले गेल आहे. या बेटांवर कब्जाच्या प्रयत्नात अमेरिका इराणच्या क्षेत्रात दीर्घकाळापर्यंत चालणाऱ्या संघर्षात गुंतून पडू शकतो.
अमेरिका करणार बेटांवर कब्जा
आखाताच्या वरच्या भागात तेल केंद्र खार्ग बेटावर कब्जा करण्याऐवजी आखाताच्या खालच्या भागात स्थित या तीन बेटांवर कब्जा करणे अधिक उपयुक्त ठरण आहे. या बेटांवर इराण आणि युएईदरम्यान असलेला वादही अमेरिकेसमोर अडचण ठरू शकते. अमेरिकेने या बेटांना नियंत्रणात घेत इराणच्या नव्या सरकारला ती परत केल्यास युएई नाराज होऊ शकतो. याचमुळे हे प्रकरण अत्यंत जटिल असल्याचे शूस्टर यांचे सांगणे आहे.