7 कंपन्यांच्या बाजार भांडवलात वाढ
इन्फोसिस, टीसीएसचे मूल्य सर्वाधिक वाढले, सेन्सेक्स 890 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
आघाडीवरच्या दहापैकी सात कंपन्यांचे बाजार भांडवल मागच्या आठवड्यामध्ये 1 लाख 50 हजार कोटींनी वाढले असल्याचे दिसून आले आहे. आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिस आणि टीसीएस यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. यासोबतच रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या बाजार भांडवलामध्ये वाढ झाली आहे.
दुसरीकडे आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बजाज फायनान्स यांच्या बाजार भांडवलामध्ये मात्र घसरण झालेली पाहायला मिळाली. मागच्या आठवड्यामध्ये शेअरबाजारात 7 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य 1 लाख 50 हजार 679.28 कोटी रुपयांनी वाढले होते. मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 890 अंकांनी वधारला होता. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसचे बाजार भांडवल मूल्य 62,148 कोटी रुपयांनी वाढून 12 लाख 81,637 कोटी रुपयांवर पोहोचले होते. दुसरीकडे इन्फोसिसचे बाजार भांडवल मूल्य 28,616 कोटी रुपयांनी वाढून 5 लाख 96,681 कोटी रुपयांवर पोहोचले होते. तेल, मोबाईलसह विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय करणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यामध्ये 28,111 कोटी रुपयांनी वाढून 15 लाख 93 हजार 893 कोटी रुपयांवर पोहोचले होते. एचडीएफसी बँकेच्या बाजार भांडवलातदेखील 11,136 कोटी रुपयांनी वाढ होऊन भांडवल 11 लाख 42 हजार 215 कोटी रुपयांवर स्थिर झाले होते.