For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खरीपासाठी 7.40 लाख हेक्टराचे उद्दिष्ट

10:04 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
खरीपासाठी 7 40 लाख हेक्टराचे उद्दिष्ट
Advertisement

   कृषी खात्याची माहिती : आवश्यक बी-बियाणांचा भरणा करण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : यंदा जिल्ह्यात कृषी खात्याने 7.40 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पेरणीसाठी लागणारी बी-बियाणे, खते आणि किटकनाशक व यंत्रसामुग्री पुरविली जाणार आहेत. सर्व तयारी वेळेत पूर्ण करुन शेतकऱ्यांना बी-बियाणांचा तुटवडा पडणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे, अशी माहिती कृषी खात्याने दिली आहे. जिल्ह्यात गतवर्षी 7.10 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र पावसाअभावी केवळ 3.27 लाख हेक्टरमध्ये पेरणी पूर्ण झाली होती. त्यामुळे गतवर्षी उद्दिष्ट घसरले होते. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पेरणीचे वेळेत उद्दिष्ट पूर्ण होईल, अशी अपेक्षा खात्याने वर्तविली आहे. खरीप हंगामात भात, ज्वारी, मका, तूर, उडीद, मूग, भुईमूग, सुर्यफूल, सोयाबिन, कापूस आदी पिकांची पेरणी व लागवड होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात बियाणे खते आणि कीटकनाशकांची गरज भासणार आहे.

जिल्ह्यात भात 62 हजार 595 हेक्टरात, ज्वारी 11 हजार 95 हेक्टरमध्ये, तूर 14 हजार 800 हेक्टर, उडीद 10 हजार 636 हेक्टर, मूग 39 हजार 692 हेक्टर, भुईमूग 26 हजार 155 हेक्टर, सुर्यफूल 5 हजार 384, सोयाबिन 97 हजार 954, कापूस 37 हजार 646 हेक्टरमध्ये पेरणी केली जाणार आहे. सर्वाधिक उसानंतर सोयाबिनचे क्षेत्र अधिक आहे. यंदाच्या हंगामासाठी कृषी खात्याने 41 हजार 61 क्विंटल बी-बियाणांचे उद्दिष्ट ठेवले आहे. गतवर्षी पावसाअभावी बियाणे मोठ्या प्रमाणात गोडावूनमध्येच शिल्लक राहिली होती. पाऊस नसल्याने बियाणे जाग्यावर पडून असल्याचे पहावयास मिळाले. यंदा वेळेत पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे बी-बियाणांची वेळेत उचल होईल, असा विश्वासही खात्याने वर्तविला आहे. जिल्ह्यात असलेल्या रयत संपर्क केंद्र, कृषी पत्तीन संघांतून बी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा पुरवठा केला जाणार आहे. शिवाय जिल्ह्यात तात्पुरती केंद्रेही स्थापन केली जाणार आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे आणि खते पुरविली जाणार आहेत.

Advertisement

आवश्यक बी-बियाणांचा भरणा करावा

रयत संपर्क केंद्र आणि कृषी पत्तीन संघामध्ये अनावश्यक बी-बियाणे आणि खतांचाच भरणा अधिक केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी दुकानांतून बी-बियाणे खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे आर्थिक फटकाही बसू लागला आहे. यंदा तरी कृषी खाते आवश्यक बी-बियाणे पुरविणार का? असा प्रश्नही शेतकऱ्यांनी केला आहे. दरवर्षी कृषी खात्याकडून अनावश्यक बी-बियाणांचा भरणा होत असल्याने लाखो रुपयांचा चुराडा होत असल्याचा आरोपही शेतकरी करत आहेत. त्यामुळे स्थानिक शिवारात जी बियाणे आणि खते लागणार आहेत तीच बियाणे आणि खते केंद्रातून उपलब्ध करावीत, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

7.40 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्टे

यंदा कृषी खात्याने 7.40 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. हवामान खात्यानेही समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके वेळेत पुरविली जाणार आहेत. याबाबत सर्व कृषी अधिकारी, रयत संपर्क केंद्र आणि प़ृषी पत्तीन संघांना सूचना करण्यात आल्या आहेत.

शिवनगौडा पाटील-सहसंचालक कृषी खाते

Advertisement
Tags :

.