वनुआतुमध्ये 7.3 तीव्रतेचा भूकंप
इंटरनेट, फोन सेवा ठप्प : त्सुनामीचा इशारा जारी
वृत्तसंस्था/ पोर्ट विला
दक्षिण प्रशांत महासागरातील बेटसदृश देश वनुआतुमध्ये मंगळवारी सकाळी 7.3 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा भूकंप सकाळी 7 वाजून 17 मिनिटांनी जाणवला. भूकंपाचे केंद्र जमिनीत 57 किलोमीटर खोलवर राजधानी पोर्ट विलापासून 30 किलोमीटर अंतरावर होते. या भूकंपामुळे वनुआतुमध्ये मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
भूकंपानंतर 5.5 तीव्रतेचा आफ्टरशॉकही जाणवला असल्याची माहिती अमेरिकन जियोलॉजिकल सर्वेने दिली आहे. भूकंपानंतर झालेल्या हानीबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतु सरकारच्या सर्व वेबसाइट्स ऑफलाइन झाल्या आहेत. तसेच पोलीस आणि अन्य यंत्रणांचे संपर्कक्रमांकही काम करत नसल्याचे समोर आले. सोशल मीडियावर भूकंपाचे अनेक व्हिडिओ पोस्ट झाले असून यातील एका व्हिडिओत ब्रिटन, फ्रान्स आणि न्यूझीलंडचे दूतावास असलेल्या इमारतीला नुकसान पोहोचल्याचे दिसून येते.
भूकंपानंतर युएसजीएसने त्सुनामीच्या लाटांचा इशारा दिला आहे. या लाटा 1 मीटरपर्यंत उंच असू शकतात, वनुआतुची अनेक बेटं ही समुद्रसपाटीपासून केवळ 3 फूटच (1 मीटर) उंच आहेत. वनुआतुबरोबर पापुआ न्यू गिनी, फिजी आणि सोलोमन आयलँड यासारख्या बेटसदृश देशांसाठी देखील त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. परंतु न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने स्वत:च्या नागरिकांना माहिती देत त्सुनामीची शक्यता फेटाळली आहे.
वानुआतू हा 80 बेटांचा समूह असून देशात सुमारे 3 लाख लोकांचे वास्तव्य आहे. वानुआतूत भूकंपामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.