7.28 कोटी जणांनी भरले आयटी रिटर्न्स
वृत्तसंस्था / मुंबई
31 जुलैपर्यंत आर्थिक वर्ष 2024-25 साठी 7.28 कोटी जणांनी आयटी रिटर्न्स दाखल केले असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे. या एकंदर प्राप्तिकर भरण्याच्या प्रक्रियेमध्ये 5.27 कोटी जणांनी नव्या कर प्रणालीमार्फत रिटर्न भरला आहे तर 2.01 कोटी लोकांनी जुन्या कर प्रणालीनुसार रिटर्न फाईल केले आहे. मागच्या वर्षी 6.77 कोटी जणांनी रिटर्न भरले होते. आयटी रिटर्न दाखल करण्याची तारीख 31 जुलै हीच अंतिम होती आणि आता त्याला मुदतवाढ मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
31 जुलैला विक्रमी संख्या
चालू आर्थिक वर्षाकरीता आयकर प्रणालीमध्ये बदल करण्यात आला असून याचा फायदा वेतनदार वर्गाला होणार आहे. सलग तिसऱ्या वर्षी आयटी रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै हीच ठेवण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक आयटी रिटर्न 31 जुलै रोजी 59.92 लाख इतक्या संख्येने दाखल झाल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे.
रिटर्न भरण्यास मदत
रिटर्न भरण्याचा वेग पाहिल्यास 17 जुलै रोजी प्रति सेकंदाला 917 जणांनी आयटी रिटर्न दाखल केले तर याच तुलनेमध्ये 31 जुलै रोजी प्रति मिनिट 9367 जणांनी आयटी रिटर्न भरले. याच दरम्यान ई फाइलिंग हेल्प डेस्कच्या माध्यमातून सुमारे 10.64 लाख करदात्यांना रिटर्न फाईल करण्यासाठी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आवश्यक ती मदत केली.