विधानसभेसाठी सिंधुदुर्गात ६,७२,०५३ मतदार ,९२१ मतदान केंद्रे निश्चित
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची महिती ; सावंतवाडी, कणकवली मतदारसंघ खर्चाच्या दृष्टीने संवेदनशील
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ६ लाख ७२ हजार ५३ मतदार व ९२१ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने आपले काम सुरु केले आहे. जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या एकही संवेदनशील मतदार संघ नसला तरी खर्चाच्या दृष्टीने कणकवली आणि सावंतवाडी मतदारसंघ संवेदनशील आहे. लोकसभेप्रमाणे या निवडणुकीतही दिव्यांग व ८५ वर्षावरील मतदारांना घराकडूनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपजिल्हानिवडणूक अधिकारी राहुल शेवाळे , जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत उपस्थित होते.