महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यात 67.35 टक्के मतदान

06:53 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

14 मतदारसंघांत शांततेत मतदान : 247 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्यात दक्षिण कर्नाटकातील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये शुक्रवारी पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान झाले. ईव्हीएममध्ये 247 उमेदवारांचे राजकीय भवितव्य बंद झाले आहे. एकूण 67.35 टक्के मतदान झाले. मंड्या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 74.87 टक्के तर बेंगळूर सेंट्रल मतदारसंघात सर्वात कमी 48.61 टक्के मतदान झाले. बेंगळूरवासियांनी यावेळी देखील मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

दक्षिण कर्नाटकातील उडुपी-चिक्कमंगळूर, हासन, मंगळूर, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर-कोडगू, चामराजनगर, बेंगळूर ग्रामीण, बेंगळूर उत्तर, बेंगळूर दक्षिण, बेंगळूर सेंट्रल, चिक्कबळ्ळापूर आणि कोलार या लोकसभा मतदारसंघांत मतदान झाले. एकूण 247 उमेदवार निवडणूक आखाड्यात होते. त्यामध्ये 226 पुरुष तर 21 महिला उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने सर्व 14 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले होते. तर युती केल्यामुळे भाजपने 11 तर निजदने 3 मतदारसंघात उमेदवार दिले.

चामराजनगरवरील एका मतदानकेंद्रावरील दगडफेक, काही ठिकाणी मतदानावर बहिष्कार, काही केंद्रांतील मतदान यंत्रातील किरकोळ त्रुटी वगळता सर्व 14 मतदारसंघांमध्ये सुरळीत आणि शांततेत मतदान झाले. सायंकाळी 6 वाजण्याआधी मतदान केंद्रात आलेल्यांनाच 6 नंतर मतदान करण्याची परवानगी देण्यात आली. बहुतेक सर्वच ठिकाणी मतदार उत्साहाने मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्याचे दिसून आले. हासन, मंगळूर, चिक्कमंगळूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका मतदान केंद्रावर ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मतदान प्रक्रियेत काहीवेळ व्यत्यय आला. मतदानयंत्र बदलून नंतर मतदान सुरू करण्यात आले.

सकाळी 7 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली. दुपारी 12 ते सायंकाळी 4 पर्यंत उन्हामुळे संथगतीने मतदान झाले. सायंकाळनंतर पुन्हा मतदार मतदान केंद्रांकडे जात असल्याचे दिसून आले.

चामराजनगरमध्ये मतदान केंद्रात तोडफोड

मतदानावर बहिष्कार घातलेल्या ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी केलेल्या अधिकाऱ्यांवर लोकांनी आंदोलन करत दगडफेक केल्याची घटना चामराजनगर जिल्ह्याच्या हनूर तालुक्यातील इंडिनगत्त येथे घडली. गावात पिण्याचे पाणी आणि सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी काही लोकांना मतदानासाठी मतदान केंद्रावर आणले. त्यावेळी गावातील एका गटाने तेथे येऊन मतदानावर बहिष्कार घातल्याचे सांगत गोंधळ घातला. त्यावेळी अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये वादावादी झाली. वाद विकोपाला गेल्याने पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे संतप्त जमावाने मतदान केंद्रातील इव्हीएम मशीन, टेबल-खुर्च्या व इतर साहित्याची मोडतोड केली. यावेळी दगडफेकही करण्यात आली.

मतदान केंद्रावर डॉक्टरने वाचविले महिलेचे प्राण

मतदानासाठी आलेल्या महिलेला हृदयविकाराचा धक्का बसून खाली कोसळलेल्या  महिलेचे तेथेच असलेल्या डॉक्टरने प्राण वाचविले. सकाळी जे. पी. नगर येथील एका मतदान केंद्रात 50 वर्षीय महिलेला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यावेळी मतदानासाठी रांगेत असलेल्या डॉ. गणेश श्रीनिवासप्रसाद यांनी त्या महिलेला सीपीआर देऊन प्राण वाचविले. तसेच रुग्णवाहिका मागवून हॉस्पिटलला पाठविले.

अनेक गावांमध्ये मतदानावर बहिष्कार

पायाभूत सुविधा पुरविण्याची मागणी करत अनेक गावांमध्ये शुक्रवारी मतदानावर बहिष्कार घालण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. चित्रदुर्ग जिल्ह्यातील मॅक्लुरहळ्ळी आणि कोलार जिल्ह्यातील बेग्लीबेणजेनहळ्ळी येथे ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला. बेंगळूर ग्रामीण जिल्ह्याच्या दोड्डाबळ्ळापूर तालुक्यातील गोल्लहळ्ळी येथे ग्रामस्थांनी स्मशानभूमी, समुदाय भवन मंजूर झाले नसल्याने मतदान करण्यास नकार दिला. चामराजनगर जिल्ह्याच्या हनूर तालुक्यातील मलेमहादेश्वर ग्रा. पं. कक्षेतील इंडिनगत्त, मेंदारे, तुळसीकेरे, तेकणे, पडसलनत्त गावातील लोकांनीही मतदान केले नाही.

100 टक्के मतदान

मंगळूर जिल्ह्याच्या बेळतंगडी तालुक्यातील बांजारमले हे गाव इतर गावे, शहरांसाठी आदर्श ठरले आहे. या गावत 100 टक्के मतदान झाले आहे. गावात 111 मतदार असून त्या सर्वांनी मतदान केले. विशेष म्हणजे बंजारमले हे गाव नक्षलग्रस्त भागात येते. येथील मतदान केंद्रावर सीएपीएफची तुकडी व पोलीस  बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

नेते, स्वामीजींनीही केले मतदान

राज्यात शुक्रवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय नेते, धर्मगुरुंनी मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसूर जिल्ह्यातील जन्मगाव सिद्धरामनहुंडी येथे मतदान केले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पत्नी चेन्नम्मा यांच्यासोबत येऊन हासन जिल्ह्याच्या पडवलहिप्पे येथे मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी त्यांनी गावातील कोदंडरामेश्वर व परमेश्वर मंदिरात पूजा केली. याच मतदान केंद्रात माजी मंत्री एच. डी. रेवण्णा, त्यांची पत्नी भवानी रेवण्णा, पुत्र व हासनचे निजद उमेदवार प्रज्ज्वल रेवण्णा, सुरज रेवण्णा यांनी मतदान केले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याच्या दो•आलहळ्ळी येथे पत्नीसमवेत मतदान केले. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बिडदी तालुक्यातील केतगानहळ्ळी येथे पत्नी अनिता व पुत्र निखिल यांच्यासमवेत मतदान केले. तुमकूरच्या सिद्धगंगा मठाचे सिद्धलिंग स्वामीजी यांनी सिद्धगंगा येथे तर म्हैसूरच्या सुत्तूर मठाचे शिवरात्री देशीकेंद्र स्वामीजी यांनी सुत्तूर येथे, आदिचुंचनगिरी मठाचे निर्मलानंदनाथ स्वामींनी बेंगळूरच्या चुंचनहळ्ळी येथे तर रंभापुरी मठाधीशांनी बाळेहोन्नूर येथे मतदान केले.

 राज्यात दुसऱ्या टप्प्यात या मतदारसंघांत होणार मतदान

बेळगाव, चिकोडी, बागलकोट, गुलबर्गा, विजापूर, रायचूर, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी, हावेरी, धारवाड, कारवार, दावणगेरे, शिमोगा

► चिक्कबळ्ळापूर शहरातील मतदान केंद्र क्र. 161 मध्ये एकाच कुटुंबातील 99 जणांनी मतदान केले

► मंड्या तालुक्यातील काळेनहळ्ळी येथे मतदानासाठी सोनिका नामक युवती लंडनहून गावी आली.

► चित्रदुर्ग जिल्ह्याच्या होट्टेप्पनहळ्ळी येथे मतदान केंद्रावर 55 वर्षी महिला एपीआरओचा कमी रक्तदाबामुळे मृत्यू

► कोडगू जिल्ह्यातील बी. शेटीगेरी येथे मतदानानंतर मतदान केंद्रातून बाहेर पडलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू

► हासनमधील संतेपेटे येथील मतदान केंद्र क्र. 189 मध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान एक तास विलंबाने सुरू

► मंड्या जिल्ह्याच्या चन्नेगौडनहळ्ळी येथे मतदान करून घरी परतलेल्या 87 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

► तुमकूरमध्ये एस. एस. पुरम येथे मतदान करून घरी परतलेल्या कापड दुकानदाराचा मृत्यू

 

मतदारसंघ आणि मतदानाची टक्केवारी

कोलार 71.26

चिक्कबळ्ळापूर 70.97

चामराजनगर 69.85

म्हैसूर-कोडगू 69.85

मंड्या 74.87

तुमकूर 72.10

चित्रदुर्ग 67

मंगळूर 71.83

हासन 72.13

उडुपी-चिक्कमंगळूर 72.13

बेंगळूर ग्रामीण 61.78

बेंगळूर दक्षिण 49.37

बेंगळूर सेंट्रल 48.61

बेंगळूर उत्तर 50.04

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article