4 कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्यात 65 हजार कोटींची भर
मुंबई :
शेअर बाजारातील 10 पैकी 4 कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य मागच्या आठवड्यात 65,671 कोटी रुपयांनी वाढले असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे बाजार भांडवल मूल्य सर्वाधिक वाढले असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
मागच्या आठवड्यामध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 175 अंकांनी वाढून बंद झाला होता. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेल यांच्या बाजार भांडवलामध्ये मागच्या आठवड्यामध्ये वाढ झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बजाज फायनान्स यांच्या बाजारभांडवलामध्ये मात्र घसरण अनुभवायला मिळाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजार भांडवलामध्ये 26 हजार 14 कोटी रुपयांची वाढ झाली असून कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 16 लाख 19 हजार 907 कोटी रुपयांवर पोहोचले. एचडीएफसी बँकेच्या बाजार भांडवलामध्ये 20 हजार 490 कोटी रुपयांची भर पडली असून ते 11 लाख 62 हजार 706 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भारती एअरटेलच्या बाजार भांडवलामध्ये 14 हजार 135 कोटींची वाढ झाली असून बाजार भांडवल मूल्याने 5 लाख 46 हजार 720 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. आयसीआयसीआय बँकेच्या बाजार भांडवल मूल्यामध्ये देखील 5 हजार 30 कोटी रुपयांनी वाढ झाली असून बाजार भांडवल मूल्य 6 लाख 51 हजार 285 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.