तोलाईदार हजर नसल्याने 65-35 चा फॉर्म्युला
कोल्हापूर :
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती मधील कांदा बटाटा विभागात तोलाईदार हजर राहत नसल्याने काही व्यापारी स्वत:ची माणसे लावून तोलाईचे काम करून घेतात. यामधूनच कांदा बटाटा विभागात तोलाई मध्ये 65-35 चा फॉर्मुला सुरू असल्याचा खुलासा समितीच्याच एका संचालकाने केला.
यावरून कांदा बटाटा विभागातील तोलाईदार नेमके करतात काय? खुलेआमपणे सुरू असणाऱ्या या गैरप्रकाराला अर्थकारणातून समिती प्रशासनाचे पाठबळ मिळते का?असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
बाजार समितीमध्ये शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वजन अचूक होण्यासाठी समितीकडून तोलाईदारांची नेमणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून एखादा व्यापारी शेतीमाल खरेदी करत असताना त्या शेतमालाचे तसेच व्यापाऱ्याकडून ग्राहकाला विक्री होणाऱ्या मालाचे वजन अचूक होते का नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी तोलाईदारावर असते. यासाठी समितीमधील प्रत्येक विभागात तोलाईदारांची नेमणूक केली आहे. तोलाईदारांची नेमणूक करताना ते संबंधित व्यापाऱ्यांचे कुटुंबीय असू नयेत असा नियम आहे. त्यानुसार मध्यंतरी कांदा-बटाटा विभागातील व्यापाऱ्यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांच्या नावावर असणारे 16 तोलाईदाराचे परवाने समितीने रद्द केले होते. मात्र राजकीय बळ वापरून एका संचालकांने या सोळा तोलाईदारांना पुन्हा तोलाईचे परवाने मिळवून दिले.
- काय आहे 65- 35 फॉर्म्युला
कांदा बटाटा विभागातील शेतीमालाचे अचूक वजन करण्यासाठी माथाडी बोर्ड कडून व्याप्रायांच्या दुकानात तोलाईदारांची नेमणूक केली जाते. यासाठी संबंधित व्यापारी माथाडी बोर्डकडे तोलाई भरतो. मात्र समितीमधील काही ठराविक व्याप्रायांच्या दुकानांमध्ये तोलाईदारच उपलब्ध नसतात. म्हणजेच संबंधित व्याप्रायांनी आपले कुटुंबीय अथवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावे तोलाईदाराचे लायसन घेतले आहे. ज्याच्या नावे तोलाइचे लायसन आहे. तो तोलाईदार प्रत्यक्षात तेथे कामावर हजर नसतो. मात्र त्या तोलाईदराच्या नावावर संबंधित व्याप्रायाकडून तोलाईचे पैसे भरले जातात. या तोलाईच्या पैशांमधील 35 टक्के रक्कम माथाडी बोर्ड कडून पुन्हा संबंधित व्याप्रायाला दिली जाते. या प्रकारतून एक प्रकारे प्रामाणिकपणे काम करण्राया तोलाईदारांचे आर्थिक नुकसान केले जात आहे.
- 4 महिन्यात 16 लाख रुपये माथाडी बोर्डने दिले
समितीमधील 16 अडत दुकानदारांकडे तोलाईचे परवाने आहेत. या 16 तोलाईदारांकडून भरल्या जाणाऱ्या तोलाई पैकी पस्तीस टक्के रक्कम माथाडी बोर्डकडून परत केली जाते. त्यानुसार 14 महिने भरलेल्या तोलाई पैकी 16 लाख रुपये माथाडी बोर्ड ने संबंधित 16 व्यापाऱ्यांना दिल्याचे संचालकानेच सांगितले.
- संगनमताने प्रकार सुरू
कांदा बटाटा विभागातील काही व्यापाऱ्यांनी ठराविक व्यापाऱ्यांना तोलाईचा परवाना का? असा प्रश्न उपस्थित करत आम्हालाही तोलाईचा परवाना द्या अशी मागणी समितीकडे केली होती. यावेळी संबंधित सोळा तोलाईदारांची परवाने रद्द करण्यात आले. मात्र काही काळानंतर राजकीय हस्तक्षेपातून पुन्हा या 16 तोलाईदारांना परवाने दिले गेले. काही ठराविकच व्यापाऱ्यांना बेकायदेशीररित्या तोलाईचे परवाने दिले जात असल्याने संबंधित व्यापारी बाजार समिती प्रशासन आणि माथाडी बोर्ड प्रशासन यांच्यामधून संगनमताने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.
- बटाटा लसणाची तोलाई बुडीत
कांदा बटाटा विभागातील काही व्यापाऱ्यांकडून बटाटा व लसणाची तोलाई भरलीच जात नसल्याची चर्चा आहे. गेल्या वर्षभरात बटाट्याची 6.70 लाख क्विंटल तर लसणाची 68 हजार क्विंटल इतकी आवक झाली आहे. आवकेनुसार बटाटा व लसणाची तोलाईची रक्कम सुमारे 50 लाख इतकी होते.