राज्यात 6,450 कोटींच्या गुंतवणुकीची हमी
उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी जपान, दक्षिण कोरिया दौऱ्याविषयी दिली माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
अवजड आणि मध्यम उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने जपान आणि दक्षिण कोरियाचा दोन आठवड्यांचा दौरा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या दौऱ्यात 6,450 कोटींच्या भांडवली गुंतवणूक हमी मिळविली आहे. ही हमी आणि गुंतवणूक करारांमुळे राज्यात 1,000 रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
विधानसौध येथे बुधवारी पत्रकार परिषदेत मंत्री एम. बी. पाटील यांनी, जपान आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमधील दौऱ्याविषयी माहिती देताना दिली. ते म्हणाले, दोन्ही देशांच्या 24 जून ते 5 जुलै या कालावधीत कर्नाटकच्या शिष्टमंडळाने विविध कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेऊन चर्चा केली. तेथील प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखांसह लघु आणि मध्यम उद्योगांसाठी भांडवली गुंतवणूक रोड शो आयोजित केले. या दौऱ्यात उत्पादन क्षेत्रासाठी राज्यात उपलब्ध असलेल्या पूरक सुविधांबाबत माहितीची देवाणघेवाण झाल्याचे त्यांनी सांगितले.
35 कंपन्यांच्या प्रमुखांची शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. पुढील वर्षी बेंगळूर येथे होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत (इन्व्हेस्ट कर्नाटक 2025) सहभागी होण्यासाठी टोकियो आणि सेऊल येथे आयोजित रोड शोमध्ये 200 हून अधिक कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
जपानमध्ये झालेल्या बैठकांमध्ये रेनेसान्स इलेक्ट्रॉनिक कार्पोरेशन, टोयोटा मोटार कार्पोरेशन, यामाहा मोटार कंपनी, सुमिटोमो हेवही इंडस्ट्रीज, पॅनासोनिक एनर्जी, निडेक कार्पोरेशन, निसान मोटार कार्पोरेशन, ब्रदर इंडस्ट्रीज, शिमाड्झु कार्पोरेशन, हिटाची आणि इतर कंपन्यांचे प्रमुख सहभागी झाले होते.
दक्षिण कोरियामध्ये व्यापार, उद्योग आणि ऊर्जा मंत्रालयाचे उपमंत्री, कोरियामधील ग्योन्गी प्रांताचे उपराज्यपाल आणि सेऊल मेट्रोपॉलिटीन सरकारमधील आर्थिक धोरणाचे उपमहापौर व सरकारी अधिकाऱ्यांसह बैठका झाल्या. दक्षिण कोरियामध्ये झालेल्या बैठकांमध्ये सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स, एलजी एनर्जी सोल्युशन्स, एलएक्स इलेक्ट्रॉनिक्स, निफ्को कोरिया, ओसीआय होल्डिंग्स, क्राफ्टन, एचवायएसी, ह्युडाई मोटर्स, वायजी-1, होईसुंग अॅडव्हान्स्ड मटेरियल्स इत्यादींचा समावेश होता, अशी माहितीही त्यांनी दिली.
कोणती कंपनी किती गुंतवणूक करणार
जपानची आघाडीची ऊर्जा कंपनी असणारी ओसाका गॅस कंपनी पुढील 5 वर्षांत गॅस वितरण पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी 5000 कोटी रु. (600 दशलक्ष डॉलर्स) गुंतवण्यास वचनबद्ध आहे.
कोरियातील मशीन टूल्स कंपनी डीएन सोल्युशन्स ही औद्योगिक यंत्रसामग्री आणि ऑटोमेशन सिस्टमसाठी उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी 1000 कोटी ऊपयांची गुंतवणूक करणार आहे. या कंपनीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. अवोयमा सैसकुशो या जपानी ऑटो पार्ट्स पुरवठेदार कंपनीने तुमकूरजवळ जपान इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी 210 कोटी रुपये गुंतवणूक करार केला आहे.
डायकी अॅक्सीस, हायव्हिजन आणि इएमएनआर कंपनी लिमिटेड बॅटरी सेलसाठी स्टोरेज आणि टेस्टिंग सेंटर तसेच पर्यावरण संरक्षण उपकरणांसाठी उत्पादन युनिट स्थापन करणार आहे. याकरिता 210 कोटींच्या संयुक्त गुंतवणूक करारांवर स्वाक्षरी केली आहे.
सुमितोमो हेवी इंडस्ट्रीज (एसएचआय) बेंगळूरमध्ये आपले मुख्य कार्यालय उघडणार असून त्याचे 2024 च्या अखेरीस उद्घाटन करण्याचे उद्दिष्ट ठेंवली आहे.
या तात्काळ गुंतवणुकीव्यतिरिक्त राज्य शिष्टमंडळाने ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स आणि एनर्जी सोल्यूशन्स क्षेत्रात 25,000 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीच्या संधी शोधल्या आहेत. ही गुंतवणूक शक्यता जागतिक गुंतवणूकदारांसाठी कर्नाटक हे गुंतवणुकीसाठी एक आकर्षक ठिकाण म्हणून महत्त्व दर्शवते, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत उद्योग विभागाचे मुख्य सचिव सेल्वकुमार, आयुक्त गुंजन कृष्णा, पायाभूत सुविधा विकास खात्याच्या सचिव डॉ. एन. मंजुळा, केआयएडीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश, पायाभूत सुविधा खात्याच्या उपसचिव हेब्सीबा राणी आदी उपस्थित होते.