गाझामधील हल्ल्यात 64 जणांचा मृत्यू
इस्रायलकडून ईदच्या दिवशीही बॉम्बवर्षाव : रफाह शहर रिकामी करण्याचे आदेश
वृत्तसंस्था/ तेल अवीव
रमजान ईदच्या दिवशीही इस्रायलने गाझावर हल्लासत्र सुरूच ठेवले आहे. सोमवारी झालेल्या हल्ल्यांमध्ये गाझामध्ये किमान 64 लोकांचा मृत्यू झाला आहे. अल जझीराच्या वृत्तानुसार, इस्रायलने वेगवेगळ्या भागात जोरदार बॉम्बवर्षाव केला. याचदरम्यान, इस्रायली सैन्याने गाझापट्टीतील दक्षिणेकडील रफाह शहराचा बहुतांश भाग रिकामा करण्याचे आदेश जारी केले आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीला इस्रायलने युद्धबंदी संपुष्टात आणल्यानंतर आणि हमासविरुद्ध हवाई व जमिनीवरील युद्ध पुन्हा सुरू केल्यानंतर सोमवारी नवे आदेश जारी केल्याचे समजते. ईदच्या दिवशी इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्यांवर हमासने कडक शब्दात टीका केली आहे. हे हल्ले इस्रायलच्या चुकीच्या विचारसरणीचे प्रतिबिंब असल्याचे हमासने म्हटले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमाससोबत युद्धबंदी कराराचा एक नवीन प्रस्ताव मांडला आहे. युद्धबंदीसाठी हमासने आपले शस्त्रs खाली ठेवावीत आणि गाझातील सुरक्षा व्यवस्था इस्रायलला सोपवावी, असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात 50,000 हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. तसेच 1,13,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध 7 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झाले होते.