63 नक्षलवाद्यांची दंतेवाडामध्ये शरणागती
चालू वर्षातील सर्वात मोठे आत्मसमर्पण
वृत्तसंस्था/ दंतेवाडा
छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे यावर्षीचे सर्वात मोठे आत्मसमर्पण नुकतेच पार पडले. पूना मारगेम (पुनर्वसनाद्वारे पुनर्जीवन) या योजनेमुळे प्रभावित होऊन 63 जहाल नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्याची माहिती शुक्रवारी देण्यात आली. यामध्ये 18 महिला आणि 45 पुरुष नक्षलवादी समाविष्ट आहेत. पोलिसांसमोर शरण आलेल्या 63 नक्षलवाद्यांपैकी 36 जणांच्या डोक्यावर मोठे बक्षीस होते. शरण आलेले नक्षली दरभा, नैऋत्य बस्तर, मार विभाग आणि ओडिशामध्ये सक्रिय होते.
डीआरजी, बस्तर फायटर्स दंतेवाडा, सीआरपीएफ दंतेवाडाच्या 111, 195 आणि 230 व्या बटालियनने नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात आणि प्रोत्साहित करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. शरण आलेल्या नक्षलवाद्यांवर सुरक्षा दलाकडून यापूर्वीच एकूण 1 कोटी 19 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी सात नक्षलवाद्यांसाठी प्रत्येकी 8 लाख रुपयांचे, सात नक्षवाद्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे, आठ नक्षलवाद्यांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे, 11 नक्षलवाद्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे आणि तीन नक्षलवाद्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.
पूना मारगेम (पुनर्वसनाद्वारे पुनर्जीवन) योजना बस्तरमध्ये कायमस्वरूपी शांतता, प्रतिष्ठा आणि एकूण प्रगतीसाठी एक परिवर्तनकारी उपक्रम म्हणून उदयास येत असल्याचे बस्तर रेंजचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पट्टीलिंगम यांनी सांगितले. केंद्र सरकार, छत्तीसगड सरकार, दंतेवाडा पोलीस, सीआरपीएफ आणि स्थानिक प्रशासन या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी, पुनर्वसन सुनिश्चित करण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध असल्याचेही ते पुढे म्हणाले.
उर्वरित नक्षलींना आत्मसमर्पणाचे आवाहन
नक्षलमुक्त बस्तरचा संकल्प पूर्ण करण्यासाठी नक्षलविरोधी कारवाया सतत राबवल्या जात आहेत. शिवाय, छत्तीसगड सरकारच्या ‘नक्षलवादी पुनर्वसन धोरणा’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी दंतेवाडा पोलीस ‘पून मारगेम’ मोहीम राबवत आहेत. या मोहिमांचा आधार घेत नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून जीवनाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे. अशा मोहिमांमुळे नक्षलवादी संघटनांना हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारण्यास आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात एकरूप होण्यास प्रोत्साहित केले जात असल्याचे दंतेवाडाचे पोलीस अधीक्षक गौरव राय आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामकुमार बर्मन यांनी सांगितले.
‘पुना मारगेम’ मोहिमेचे फायदे
आत्मसमर्पण केलेल्यांना 50,000 रुपयांची आर्थिक मदत
शरण आलेल्या नक्षलवाद्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रम
नजिकच्या काळात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार
शरणागती पत्करणाऱ्या नक्षलींना शेतीपूरक जमीनही देणार