इन्फोसिसला 6,106 कोटीचा तर टीसीएसला 11097 कोटीचा नफा
तिसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर : समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ बेंगळूर
आयटी क्षेत्रातील दोन दिग्गज कंपन्यांनी आपल्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. या अंतर्गत इन्फोसिसने वर्षाच्या आधारावर पाहता डिसेंबरला संपलेल्या आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 6 हजार 106 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. या आधीच्या वर्षामध्ये समान अवधीमध्ये कंपनीने 6586 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये पाहता निव्वळ नफा 7 टक्के घटला आहे. बेंगळूर मधील इन्फोसिस कंपनीने सदरच्या तिमाहीमध्ये 38,821 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीमध्ये कंपनीने 38 हजार 318 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी नाममात्र 1 टक्का महसूल वाढला आहे.
टीसीएसची कामगिरी
दुसरीकडे आयटी क्षेत्रातील आणखीन एक दिग्गज कंपनी टीसीएसनेही आपल्या तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी तिसऱ्या तिमाहीत 2 टक्के इतकी वाढ निव्वळ नफ्यामध्ये दिसून आली आहे. टाटा समूहातील टीसीएस कंपनीने डिसेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये 11 हजार 97 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे.
मागच्या वर्षाच्या तुलनेत नफ्यामध्ये नाममात्र 1 टक्का वाढ झाली आहे. मागच्या वर्षी याच समान कालावधीत कंपनीने 10,883 कोटी रुपयांचा एकत्रित नफा प्राप्त केला होता. दुसरीकडे 4 टक्के वाढीसह कंपनीने तिसऱ्या तिमाहीत 60,0583 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच अवधीमध्ये 58,229 कोटी रुपयांचा एकत्रित महसूल कंपनीने प्राप्त केला होता. तज्ञांनी कंपनी नफ्यामध्ये 7 ते 11 टक्के वाढ दर्शवू शकते, असा अंदाज वर्तवला होता, तो फोल ठरला आहे.
समभाग वधारले
आयटी कंपन्यांचे समभाग तिमाहीच्या निकालानंतर शेअरबाजारात 7 टक्क्यापर्यंत वाढलेले दिसले. शुक्रवारी शेअरबाजारात दोन्ही कंपन्यांच्या समभागांनी तेजी दर्शवली. इन्फोसिसचा समभाग 7 टक्के वाढत 1594 रुपयांवर पोहचला तर टीसीएसचा समभाग 3 टक्के वाढत 3893 रुपयांवर पोहचला होता.