‘फोन पे’ चे 60 कोटी वापरकर्ते
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
फिनटेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीमध्ये गुंतली आहे. अलीकडेच कंपनीने 60 कोटी इतक्या वापरकर्त्यांची संख्या पार केली आहे. बेंगळूर येथे मुख्यालय असणाऱ्या फोन पे चे गेल्या 16 महिन्यात 1 कोटीपेक्षा अधिक वापरकर्ते झालेले आहेत अशीही माहिती मिळते आहे. एकंदर पाहता नोंदणीकृत वापरकर्त्यांची संख्या 60 कोटीपेक्षा अधिक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 40 दशलक्ष व्यापारी सध्याला फोन पेचा वापर करत आहेत. 330 दशलक्ष इतके रोजचे व्यवहार फोन पेच्या माध्यमातून होत आले आहेत. ज्यांचे रुपयांमध्ये मूल्य पाहता 150 ट्रिलियनपेक्षा अधिक मूल्य होते.
काय म्हणाले सीईओ
कंपनीचे सहसंस्थापक आणि सीईओ समीर निगम यांनी कंपनीच्या वापरकर्त्यांच्या संख्येचा केलेला विक्रम हा संस्थेसाठी अभिमानास्पद असा क्षण आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारामध्ये अग्रेसर असणारी कंपनी ग्राहक व वापरकर्त्यांना विश्वासार्ह सेवा देण्यासाठी तत्पर असणार आहे.
यूपीआय व्यवहारात फोन पेचा डंका
भारतामध्ये यूपीआय पेमेंट क्षेत्रामधील व्यवहारात फोन पे ची हिस्सेदारी 47 टक्के इतकी आहे. गेल्या महिन्यात कंपनीने आपल्या आयपीओ सादरीकरणाच्या प्रक्रियेला गती देण्यास सुरूवात केली आहे. आपल्या व्यवसायाला कंपनीने देशामध्ये नुकतेच एक दशक पूर्ण केले आहे.