For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांवर मतदान

06:59 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांवर मतदान
Advertisement

 21 राज्यातील 102 जागांवर निवडणूक : मणिपूरमध्ये गोळीबार, बंगालमध्ये हिंसाचार; त्रिपुरात सर्वाधिक मतदान

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. काही राज्यांमध्ये झालेला हिंसाचार वगळता कडक उन्हाच्या झळा असतानाही जवळपास 60 टक्क्यांहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदानाची अधिकृत आणि अंतिम टक्केवारी शनिवारी सकाळीच स्पष्ट होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 हजार 625 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.

Advertisement

पहिल्या टप्प्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील ठराविक जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. या टप्प्यात 1,491 पुऊष आणि 134 महिला असे एकंदर 1,625 उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित करण्यासाठी  सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजता संपले. अऊणाचल आणि सिक्कीम या दोन राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभेसाठीही शुक्रवारीच मतदान प्रक्रिया पार पडली. बिहारमधील नक्षलग्रस्त भागात दुपारी चार वाजता मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली. मात्र, मतदान केंद्रांवर पोहोचलेल्या आणि रांगेत उभे असलेल्या मतदारांना मतदान करू दिले जात होते.

निवडणूक आयोगाबरोबरच पंतप्रधान मोदींनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांनी हिंदी, तमिळ, मराठी अशा 5 भाषांमध्ये ट्विट केले. दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 39.9 टक्के मतदान झाले होते. दुपारी 3 वाजेपर्यंत त्रिपुरामध्ये सर्वाधिक 68.35 टक्के मतदान झाले. तर बिहारमध्ये सर्वात कमी 39.73 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 21 राज्यांमध्ये सरासरी 53 टक्के मतदान झाले आहे. बंगालमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वाधिक 77.57 टक्के मतदारांनी मतदान केले. तर बिहारमध्ये केवळ 46.32 टक्के मतदारांनी मतदान केले. इतर राज्यांच्या मतदानाच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, त्रिपुरामध्ये 76.10, आसाममध्ये 70.77, पुद्दुचेरीमध्ये 72.84, मेघालयमध्ये 69.91, मणिपूरमध्ये 68.62, सिक्कीममध्ये 68.06, जम्मू  काश्मीरमध्ये 65.08, छत्तीसगडमध्ये 63.41 टक्के मतदान झाले. तसेच उत्तर प्रदेशात 57.54 टक्के, तामिळनाडूमध्ये 62.08, मध्य प्रदेशात 63.25, महाराष्ट्रात 54.85 आणि राजस्थानमध्ये 50.27 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

प. बंगाल, मणिपूरमध्ये हिंसाचार

मतदानादरम्यान मणिपूरमधील बिष्णुपूरमध्ये गोळीबार, पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये हिंसाचार आणि छत्तीसगडच्या विजापूरमध्ये ग्रेनेड स्फोट झाला. या स्फोटात एक असिस्टंट कमांडंट आणि एक शिपाई जखमी झाला आहे. या टप्प्यात मणिपूरच्या दोन लोकसभा जागांवर (मणिपूर इनर आणि मणिपूर बाह्य) मतदान होत आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 26 एप्रिलला मणिपूरच्या बाह्या क्षेत्रातील काही भागात मतदान होणार आहे. कूचबिहारमध्ये मतदानादरम्यान दगडफेकीची घटना समोर आली आहे. चांदमारी भागात दगडफेक झाल्याचे सांगण्यात आले. या दगडफेकीत भाजपचा एक कार्यकर्ता जखमी झाला आहे.

पहिल्या टप्प्यातील 102 जागांपैकी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 39 म्हणजे संपूर्ण राज्यात मतदान पार पडले. तसेच उत्तराखंडमधील सर्व पाच जागांसाठीही मतदान पूर्ण झाले. त्याव्यतिरिक्त राजस्थानमधून 12, उत्तर प्रदेशातून 8, अऊणाचल प्रदेशमधून 2, बिहारमधून 4, छत्तीसगडमधून 1, आसाममधून 4, मध्य प्रदेशातून 6, महाराष्ट्रातून 5, मणिपूरमधून 2, मेघालयातून 2, मिझोराममधील 2, त्रिपुरातील 1, पश्चिम बंगालमधील 3, तसेच जम्मू काश्मीर, अंदमान निकोबार, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमधील प्रत्येकी एका जागेवर मतदान झाले.

2019 मध्ये लोकसभेच्या या 102 जागांपैकी भाजपने 40, द्रमुकने 24 आणि काँग्रेसने 15 जागा जिंकल्या होत्या. इतरांना 23 जागा मिळाल्या होत्या. या टप्प्यात बहुतांश जागांसाठी या तीन पक्षांमध्ये लढत आहे. पहिल्या टप्प्यात 8 केंद्रीय मंत्री, एक माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपालही यावेळी रिंगणात आहेत. या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सर्वानंद सोनोवाल आणि भूपेंद्र यादव, काँग्रेसचे गौरव गोगोई आणि द्रमुकच्या कनिमोझी यांचा समावेश आहे. या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. एकूण 7 टप्प्यात 543 जागांसाठी 1 जूनपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर सर्व जागांचे निकाल 4 जूनला लागणार आहेत.

Advertisement
Tags :

.