महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दुकानांवरील फलकांवर 60 टक्के कन्नडसक्ती सुरूच

11:00 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तब्बल 1296 आस्थापनांना नोटिसा : व्यावसायिकांतून तीव्र नाराजी

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारने व्यवसाय करणाऱ्या दुकानांवरील फलकांवर 60 टक्के कन्नड लिहिणे सक्ती करण्याचा आदेश दिला आहे. याबाबत विधानसभा अधिवेशनामध्ये विधेयक मंजूर केले आहे. त्यानंतर तातडीने महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी या कामाला लागले आहेत. बुधवारी विविध भागांमध्ये जाऊन दुकानचालकांना 60 टक्के कन्नडमध्ये मजकूर लिहिण्याची सूचना करत त्यांना नोटिसाही दिल्या आहेत. या प्रकारामुळे व्यावसायिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरामध्ये विविध समस्या भेडसावत आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र कन्नडसक्तीसाठी आटापिटा केला जात आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. याचबरोबर पाण्याची समस्याही गंभीर बनत चालली आहे. त्या समस्या सोडविणे महत्त्वाचे आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत केवळ कन्नडसक्ती करण्याच्या कामाकडेच हे अधिकारी लक्ष देत आहेत.

Advertisement

बेळगाव शहर असू दे किंवा तालुका या ठिकाणी मराठी भाषिकच अधिक संख्येने राहतात. त्यामुळे व्यावसायिकांनी मराठी, इंग्रजी आणि कन्नड या भाषांमध्ये फलक लिहिले आहेत. असे असताना फलकावरील 60 टक्के जागा ही कन्नडमध्ये लिहिली पाहिजे, असे म्हणून आग्रह धरला जात आहे. 60 टक्के कन्नड लिहिल्यानंतर मराठी भाषिक मात्र त्या व्यावसायिकाकडे खरेदी करण्यास नकार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यावसायिक चांगलेच अडचणीत सापडले आहेत. महानगरपालिकेच्या या अट्टाहासामुळे व्यवसायच नको म्हणण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे. तिन्ही भाषांत फलक लिहिण्यास काहीच हरकत नाही. मात्र अमूक इतकीच जागा कन्नडसाठी राखीव ठेवा, हे सांगणे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बुधवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील तसेच इतर ठिकाणच्या व्यावसायिकांना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यावसायिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात केवळ कर्नाटकातूनच नाही तर इतर राज्यांतूनही जनता येत असते. त्यामुळे त्यांना इंग्रजी किंवा इतर भाषेतील फलक समजणार आहेत. त्यामुळे बेळगावमध्ये तरी अशा प्रकारे अट लादणे चुकीचे आहे. अशा प्रतिक्रिया व्यावसायिकांतून उमटत आहेत. बुधवारी महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी दुकानदारांना समज देऊन नोटिसा दिल्या आहेत.

महानगरपालिकेकडून दहा आस्थापनांवरील फलक हटविले...

महानगरपालिकेकडून बुधवारी दहा आस्थापनांवरील फलक हटविले. तर 60 टक्के कन्नडमध्ये फलक लिहिले नाही म्हणून तब्बल 1296 आस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. तीन दिवसांच्या आत त्यांनी फलक बदलावेत, असा आदेशदेखील काढण्यात आला आहे. शहरातील किराणा दुकाने, हॉस्पिटल, हॉटेल्स, सोसायटी, स्थानिक संघ-संस्था, युवक मंडळे यांच्या फलकांवर 60 टक्के कन्नडचा उल्लेख करावा, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. जे कोण याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा नोटीसद्वारे देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article