काँग्रेस सरकारमध्ये 60 टक्के कमिशन
केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा गंभीर आरोप : घरे वाटप करतानाही घेतली जातेय लाच
प्रतिनिधी/ बेंगळूर
काँग्रेस सरकारमध्ये गरिबांना घरे वाटप करतानाही कमिशन घेतले जात असून कमिशनची रक्कम 60 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे. रविवारी सकाळी म्हैसूरमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. काँग्रेस सरकारमध्ये 60 टक्के लाच आणि कमिशन घेतले जात असल्याचे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वत: मान्य केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुमारस्वामी पुढे म्हणाले, गरिबांना घरे वाटपासाठीही लाच घेतली केली जात आहे. यापूर्वी पीडीओ लाच घेत असे. आता विधानसौधमध्ये मंत्री उघडपणे लाच घेत आहेत. सत्यमेव जयतेचा अर्थ हाच आहे का? काँग्रेसचे सत्यमेव जयते हे केवळ जाहिरातीपुरते मर्यादित आहे. सिद्धरामय्या गांधीजींच्या सत्यमेव जयतेप्रमाणे वागत आहेत का? त्यांच्या आत्म्याला त्यांनीच उत्तर द्यावे. पैसा लुटायला काही मर्यादा नाही का?, असा प्रश्न करीत कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली.
राज्यातील कंत्राटदारांची अवस्था दयनीय झाली आहे. आजची परिस्थिती पाहिली तर पूर्वीचे भाजप सरकार चांगले होते, असे काँग्रेसच्या मर्जीतील कंत्राटदार म्हणत आहेत. येत्या काही दिवसांत सिद्धरामय्या आणि काँग्रेस पक्षाला याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिला.
गॅरंटी थांबविण्यासाठी सरकार निमित्त शोधतेय!
राज्य सरकारने सरकारी बस तिकीट दरात 15 टक्क्यांनी वाढ केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना कुमारस्वामी यांनी, राज्यातील पाच गॅरंटी योजना थांबविण्यासाठी काँग्रेस सरकार कारणे शोधत आहे. कसे तरी योजना बंद करण्यासाठी निमित्त शोधत आहे. कोणत्याही कारणास्तव 5 गॅरंटी योजना थांबवू नये. याचा खूप लोकांना फायदा झाला आहे, असे तुम्ही स्वत:च सांगत आहात. अशावेळी मत देऊन सत्तेवर आणलेल्या जनतेपासून गॅरंटी योजना दूर नेण्याचे काम सरकारने करू नये. राज्य सरकार मध्यमवर्गीयांच्या जिवाशी खेळत असल्याचा संताप कुमारस्वामी यांनी व्यक्त केला.
तिकीट दरवाढीचा सर्वसामान्यांवर भार
बस तिकीट दरवाढीचा भार सर्वसामान्यांवर पडणार आहे. कोणत्याही मंत्र्यांची मुले किंवा आमदारांची मुले सरकारी बसमधून प्रवास करत नाहीत. सर्व फिरणारे सामान्य लोक आहेत. दररोज 10 ऊपयांची झालेली वाढ देखील त्यांच्यावर बोजा पडणार आहे, असेही कुमारस्वामी यांनी सांगितले.