म्यानमार भूकंपात 60 मशिदी उध्वस्त
वृत्तसंस्था / यंगून
नुकत्याच म्यानमार येथे झालेल्या प्रलयंकारी भूकंपात 60 मशिदींसह अनेक धार्मिक स्थळे उध्वस्त झाली असून मंडाले येथील प्रसिद्ध बुद्धमूर्तीही धाराशायी झाली आहे. हा भूकंप झाला तेव्हा अनेक मशिदींमध्ये नमाज पढला जात होता. नमाज पढणाऱ्या 700 मुस्लीमांचाही बळी या भूकंपात गेल्याची माहिती देण्यात आली आहे. या भूकंपात आतापर्यंत 2000 हजारांहून अधिक लोकांनी प्राण गमावले असून ही संख्या 10 हजारापारही जाऊ शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 334 अणुबाँब एकाच वेळी फुटल्यावर जी विनाशकारी ऊर्जा निर्माण होईल, तेव्हढी या भूकंपाने निर्माण केल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
मशिदींच्या विनाशासंबंधी म्यानमारच्या प्रशासनाने माहिती दिली आहे. या मशिदी जुन्या होत्या. त्यामुळे त्या भूकंपाचे धक्के सहन करु शकल्या नाहीत. 60 हून अधिक मशिदी पूर्णत: उध्वस्त झाला असून अनेक मशिदींच्या इमारतींची मोठी हानी झाली आहे. म्यानमारमध्ये अलिकडच्या काळात प्रथमच अशा प्रकारच्या हानीकारक भूकंपाचा अनुभव आल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मंडाले येथील बुद्धमूर्तीची हानी
म्यानमारमधील मंडाले या शहरातील गौतम बुद्धांची प्रसिद्ध मूर्तीही या भूकंपात कोसळली आहे. या स्थानी नवी बुद्धमूर्ती स्थापन केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. या भूकंपात बौद्ध धर्मियांची कित्येक प्रार्थनास्थळे उध्वस्त झाली आहेत. अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचीही अपरिमित हानी झाल्याचे दिसून येत आहे.