इस्रायलच्या हल्ल्यात गाझात 60 ठार
वृत्तसंस्था / तेल अवीव
इस्रायलने गाझा पट्टीवर चढविलेल्या नव्या हल्ल्यांमध्ये 60 हून अधिक पॅलेस्टाईनी नागरीकांचा मृत्यू झाला आहे. पॅलेस्टाईन अधिकाऱ्यांनी हा दावा केला आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर या हल्ल्यांचा प्रारंभ झाला होता. शनिवारी सकाळीही मोठे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये हमास या दहशतवादी संघटनेचा महत्वाचा हस्तक बिलाल अबु अमशा ठार झाला आहे. त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही मृत्यू झाला, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण विभागाने दिली.
गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन मैदानानजीक इस्रायलच्या हल्ल्यांमुळे मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे. या स्थानी किमान 12 नागरीक प्राणास मुकले आहेत. या स्थानी नागरीकांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनीही आश्रय घेतला आहे, असे प्रतिपादन इस्रायलकडून करण्यात आले. हल्ल्यात हमासचे अनेक दहशतवादी ठार झाल्याचे प्रतिपादन इस्रायलने केले. पुढच्या आठवड्यात इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधी होऊ शकते, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केले आहे. तथापि, अद्यापही इस्रायल आणि हमास एकमेकांवर हल्ले करीत आहेत.